पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्यांचा पुनरुज्जीवन प्रकल्प पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हाती घेतला आहे. जैवविविधता, जलसृष्टी नष्ट न करता हा प्रकल्प राबविला जाणार आहे. पर्यावरणवादी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या सूचनांचा समावेश पुनरुज्जीवन प्रकल्पात करण्यात येणार आहे,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.

पवना, इंद्रायणी, मुळा या तीन नद्यांचे प्रदूषण राेखण्यासाठी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार केला आहे का, सल्लागार नियुक्तीबाबत तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे का, नदी सुधारच्या नावाखाली मुळा नदीचे पात्र अरुंद केले जात आहे. त्यास पर्यावरणवादी संघटनांनी विराेध दर्शविला आहे. प्रकल्प राबवण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई हाेत आहे का, सुशाेभीकरणाच्या नावाखाली नदीकाठची जैवविविधता नष्ट केली जात आहे का, असा तारांकित प्रश्न आमदार उमा खापरे, अमित गाेरखे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, याेगेश टिळेकर, सदाशिव खाेत, परिणय फुके यांनी विचारला हाेता. त्याला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लेखी उत्तर दिले आहे.

‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा ६७१ काेटी रुपये खर्चाचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. पर्यावरण विभागामार्फत केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाकडे तो सादर केला आहे. पवना नदी सुधार प्रकल्पाचा २१८ काेटी रुपये खर्चाचा अहवाल तयार आहे. हा अहवाल राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडे प्राप्त झाला आहे. त्याची छाननी सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुठा नदी सुधार प्रकल्प राबवण्याकरिता सल्लागार नियुक्तीची कार्यवाही सुरू आहे. केंद्र शासनाचे ६० टक्के आणि दाेन्ही महापालिका व पीएमआरडीएचे ४० टक्के, सहभागातून नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. इंद्रायणी व पवना नदी सुधारसाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती केली आहे. मुळा नदी सुधारसाठी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने ना-हरकत दाखला दिला आहे. ‘जलविज्ञान’च्या अहवालानुसार काम करण्यात येत आहे,’ असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.