scorecardresearch

पुणेकरांसाठी चिंतेचा विषय! लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये करोनाची बाधा होण्याचं प्रमाण जास्त!

पुण्यात करोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी दुसऱ्या डोसनंतर पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याचं दिसून आलं आहे.

पुणेकरांसाठी चिंतेचा विषय! लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये करोनाची बाधा होण्याचं प्रमाण जास्त!
(प्रातिनिधिक छायाचित्र)

राज्यात करोना रुग्णसंख्या घटत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून येत असलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येत आहेत. राज्य सरकारकडून देखील शाळा, मंदिरं पुन्हा सुरू करण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच, दुसरीकडे लसीकरणानं देखील हळूहळू वेग घेतला असल्याने व्यापक प्रमाणावर नागरिकांना लसीकृत केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे करोना रुग्णांची संख्या जरी कमी होताना दिसत असली, तरी दुसरीकडे पुण्यात दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये करोनाची बाधा होण्याचं प्रमाण काहीसं वाढलं आहे. त्यामुळे प्रशासनासाठी ही चिंतेची बाब ठरली असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.

दुसऱ्या डोसनंतर लागण होण्याचं प्रमाण ०.२५ टक्के!

पुण्यात दुसऱ्या डोसनंतर करोनाची बाधा होण्याचं प्रमाण हे पहिल्या डोसनंतर करोनाची बाधा होण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याचं अजित पवार यांनी यावेळी नमूद केलं “पुणे शहरात करोनाबाधित होण्याचा दर २.१ टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये २.२ टक्के आणि पुणे ग्रामीणमध्ये ३.८ टक्के आहे. गेल्या आठवड्यापेक्षा परिस्थिती सुधारली आहे. मृत्यूदर देखील काहीसा कमी झाला आहे. गेल्या आठवड्यात ५ लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. लसीकरणात ५ टक्के वाढ झाली आहे. पहिला डोस घेतल्यानंतर किती लोकांना बाधा होतेय, याचा सर्वे केल्यानंतर त्यात ०.१९ टक्के लोकांना बाधा होत असल्याचं लक्षात आलं आणि दुसरा डोस घेतल्यानंतर हे प्रमाण ०.२५ टक्के इतकं आहे”, असं अजित पवार म्हणाले. पुण्यात गेल्या १५ दिवसांत रोजच्या रुग्णांमध्ये ३० टक्के आणि अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये १९ टक्के घट दिसून आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

प्रमाण जास्त का?

दरम्यान, दुसऱ्या डोसनंतर देखील करोनाची लागण होण्याचं प्रमाण जास्त का आहे, याविषयी देखील पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “हे प्रमाण जास्त का याविषयी आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की दुसरा डोस झाल्यानंतर लोक नियम फारसे पाळत नाहीत. मास्क न घालणं, इतर नियमावलीचं पालन न करणं हे घडत आहे. त्यामुळे जरी आपण टप्प्याटप्प्याने शिथिलता आणत असलो, तरी नागरिकांनी मास्क वापरलेच पाहिजेत. सामाजिक अंतर पाळलंच पाहिजे. स्वत:सोबत आपल्या परिवाराचीही काळजी घ्यायला हवी”, असं आवाहन यावेळी अजित पवार यांनी केलं.

पुण्यात सलग ७५ तास लसीकरण!

पुणे शहर आणि ग्रामीणमध्ये सलग ७५ तास लसीकरण केलं जाणार असल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं. “पुण्यात सलग ३ दिवस आणि पुढे तीन तास असे सलग ७५ तास शहर आणि ग्रामीण भागात लसीकरणाचा कार्यक्रम घेतला जाईल”, असं ते म्हणाले. “ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्यात एक कोविड आणि इतर नॉन कोविड रुग्णालयं सुरू करावीत असं सांगितलं आहे. शाळांमधून कोविडबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून मुलं त्यासंदर्भातली काळजी घेतील”, असं देखील अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deputy cm ajit pawar says corona positivity rate after second dose is increasing in pune pmw

ताज्या बातम्या