राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेकदा प्रशासकीय अधिकाऱ्यांचे देखील कामकाजासंदर्भात कान पिळले आहेत. आज पुण्यातील सिंहगड रोडवरच्या उड्डाणपुलाच्या कामाचं भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालं. यावेळी अजित पवार यांनी कंत्राटदारांना इशारा देत हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच, लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा दम देखील त्यांनी कंत्राटदारांना भरला.

“नितीन गडकरी देखील त्यांच्या भाषणात नेहमी या गोष्टींचा उल्लेख करतात. त्यामुळे कंत्राटदारांनी इथल्या नागरिकांना कमीत कमी त्रास कसा होईल आणि त्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता हे काम वेळेत पूर्ण करावं. हे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी कंत्राटदार आणि महानगर पालिकेनं सातत्यानं लक्ष द्यावं. यासाठी लागेल ती मदत करण्यासाठी राज्य सरकारकडून मी केव्हाही तयार असेन”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

गडकरी मला म्हणाले, अजित…

“गडकरी मला म्हणाले की अजित १५ मिनिटं जरा लवकर ये. या प्रकल्पात वेगळं काही करण्याचा विचार आहे. पुणे पालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वय साधून आपण काम करू. राजकारणाच्या वेळी राजकारण करूच. पण निवडणूक झाल्यानंतर जनतेनं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विकासकामांसाठी प्रयत्न करायला हवेत. ते मला सांगत होते की अजित, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि संत तुकारम महाराजांची पालखी ज्या मार्गाने जाते, त्या मार्गांसाठी जमीनीचं अधिग्रहण जवळपास पूर्ण झालं आहे. त्याचं भूमिपूजन घ्यायचं आहे”, असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले.

गडकरी म्हणाले की तुम्ही या कामांमध्ये लक्ष घातलं नाही तर फार अडचणी होतील. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचा निर्णय झाला आहे. पुण्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. कितीही रस्ते काढले, तरी ते कमी पडत आहेत. पुण्याला जगातलं सर्वात चांगलं शहर करण्याची आपली जबाबदारी आहे, असं देखील अजित पवार यांनी सांगितलं.