पुणे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या यांत्रिकी शाखेतील उपअभियंता तसेच शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अडीच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. अंगणवाडीच्या कामाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी त्यांनी लाच घेतली. उपअभियंता किरण अरुण शेटे (वय ३१) आणि शाखा अभियंता परमेश्वर बाबा हेळकर (वय ४९) अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लष्कर परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागात शेटे हे उपअभियंता तर, हेळकर हे शाखा अभियंता आहेत. खेड येथील शिरगाव गावच्या अंगणवाडीत इलेक्ट्रिक कामे आणि पाणी शुद्धीकरण यंत्र बसवण्यासाठी यातील ३४ वर्षीय लेबर कॉन्ट्रॅक्टरने अंदाजपत्रक सादर केले होते. या अंदाजपत्राला मान्यता देण्यासाठी शेटे आणि हेळकर यांनी त्यांच्याकडे अडीच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंघक विभागाकडे तक्रार केली होती. पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी सापळा कारवाईदरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात अडीच हजार रुपयांची लाच घेताना या दोघांना पकडण्यात आले.