पिंपरी- चिंचवड: विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि कुप्रसिद्ध गुन्हेगार आकाश मोहोळ उर्फ आक्या बॉण्ड हे एकमेकांना केक भरवत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आक्क्या बॉण्ड याच्यावर एकूण १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. नुकताच विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा वाढदिवस झाला आहे.

वाढदिवसानिमित्त गुन्हेगार आक्क्या बॉण्डने अण्णा बनसोडे यांच्यासाठी केक आणि गुच्छ आणला होता. अण्णा बनसोडे आणि आक्क्या बॉण्ड यांनी एकमेकांना केक भरवत वाढदिवस साजरा केला. शेजारीच असलेला आमदार पुत्र सिद्धार्थ देखील दोघांकडे बघून हसत होता. याबाबतची कल्पना आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे याला असल्याचं बोललं जात आहे. आक्क्या बॉण्ड याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अण्णा बनसोडे यांचा नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला होता.

व्यासपीठावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अण्णा बनसोडे यांना मोलाचा सल्ला देत आता विधानसभा उपाध्यक्ष असल्याने तुमच्या वागण्याकडे, बोलण्याकडे सर्वांचं बारीक लक्ष असेल. चिरंजीवांना देखील काही गोष्टी व्यवस्थित सांगितल्या पाहिजेत आपण आता मोठ्या पदावर आहोत. त्यामुळे व्यवस्थित वागलं पाहिजे. असा मोलाचा सल्ला अजित पवारांनी अण्णा बनसोडे यांनी दिला होता. यानंतर आता वाढदिवसानिमित्त कुप्रसिद्ध गुन्हेगाराने अण्णा बनसोडे यांना केक भरवल्याने मोठी चर्चा रंगली आहे. आक्क्या बॉण्डने अण्णा बनसोडे यांचा वाढदिवस साजरा केला आहे.

“माझा वाढदिवस असल्याने अनेक जण मला भेटायला आले. त्यांनी केक, गुच्छ आणला, शुभेच्छा दिल्या. ते कोण होते याबाबत मला कुठलीही कल्पना नव्हती. मी प्रत्येकाला तुम्ही कोण आहात? हे विचारू शकत नाही. मी एक जनतेतील आमदार आहे.” अण्णा बनसोडे- विधानसभा उपाध्यक्ष