लोकसत्ता प्रतिनिधी पुणे : जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध छळवणुकीची तक्रार प्रकरणात प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना तीनदा समन्स बजावूनही त्या पुणे पोलिसांसमोर हजर झाल्या नाहीत. खेडकर यांच्याशी गेल्या आठवडाभरापासून पोलीस संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, खेडकर संपर्कक्षेत्राबाहेर असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध वाशिममध्ये छळवणुकीची तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने खेडकर यांना पुणे पोलिसांकडे जबाब नोंदविण्याचे आदेश देण्यात आले होते. पुणे पोलिसांनी त्यांना दोनदा समन्स बजाविले होते. त्यावेळी खेडकर यांनी पोलिसांकडे अवधी मागितला होता. आठवडाभरानंतर त्या पोलिसांसमोर हजर झाल्या नाहीत. जबाब नोंदविण्यास उपस्थित रहावे, असे समन्स पोलिसांनी त्यांना पुन्हा बजावले. तीनदा समन्स बजावूनही त्या हजर झाल्या नाहीत. खेडेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांचा मोबाइल क्रमांक संपर्कक्षेत्राबाहेर असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. आणखी वाचा-पुढील आठवड्यात रेल्वेने प्रवास करताय? विशेष ब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द; जाणून घ्या बदललेले वेळापत्रक… जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण कालावधीत दिवसे यांनी छळ केल्याचा खेडकर यांचा आरोप आहे. तशी तक्रार त्यांनी वाशिम पोलिसांकडे केली होती. ती वाशिम पोलिसांनी पुणे पोलिसांकडे वर्ग केली आहे. प्रशिक्षणार्थी अधिकारी खेडकर यांच्या आई-वडिलांनी घटस्फोट झाल्याचे दाखवून कमी उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खेडकर दाम्पत्याचा घटस्फोट खरेच झाला आहे का, याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतर पुणे पोलिसांकडून नुकताच केंद्राकडे अहवाल सुपूर्त करण्यात आला आहे. मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी जमिनीच्या वादातून मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या दिलीप खेडकर यांना न्यायालयाने तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर सोमवारी (२९ जुलै) सुनावणी होणार आहे.