Ketan Agrwal Murder Case: केतन आणि सियाचा फेब्रुवारी महिन्यात थाटामाटात साखरपुडा झाला होता. राजस्थानमधील राजवाड्यांमध्ये ‘डेस्टिनेशन वेडिंग’ची जोरदार तयारी सुरू होती; अगदी पाहुण्यांसाठी खास विमानांचे बुकिंगही झाले होते… मात्र, जिच्यासोबत केतन नव्या आयुष्याची स्वप्ने पाहत होता, त्याच होणाऱ्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने केतनचा लोहगड किल्ल्यावरून ढकलून खून केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी उघड केली आहे.
याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया प्रवीण गोयल (वय २०) आणि तिचा प्रियकर चेतन बाबूलाल चौधरी (वय २२) यांना बेड्या ठोकल्या आहेत. सिया ही कॉमर्सची, तर चेतन हा बीबीएचा विद्यार्थी आहे. केतन अग्रवाल (वय २६) याच्या मृत्यू प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला निव्वळ अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात एक क्रूर आणि थंड डोक्याने केलेला खून असल्याचे समोर आले आहे.
अपघाताचा बनाव… हुडी घातलेल्या ‘त्या’ संशयास्पदाने फिरवली तपासाची दिशा!
१८ जून रोजी घडलेली ही घटना सुरुवातीला एक दुर्दैवी अपघात असल्यासारखी भासली होती. लोहगडावरून पाय घसरून केतन खाली कोसळल्याचा बनाव रचण्यात आला होता. केतन दरीत कोसळल्यानंतर सियाने आरडाओरडा करून सुरक्षारक्षकांना बोलावले आणि केतनच्या कुटुंबीयांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.

मात्र, केतनच्या कुटुंबीयांनी दिलेल्या काही माहितीमुळे पोलिसांचा संशय बळावला. नुकतेच केतन आणि सियामध्ये काही कारणांवरून वाद झाले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची कसून तपासणी सुरू केली. तेव्हा एका सीसीटीव्हीमध्ये सिया आणि केतन गडावर चढत असताना, त्यांच्या पाठीमागून एका व्यक्तीने डोक्यावर ‘हुडी’ (डोके, मान आणि चेहरा झाकणारा विशिष्ट प्रकारचा स्वेटशर्ट किंवा जाकीट) घालून, स्वतःचा चेहरा लपवत गडावर प्रवेश केल्याचे दिसले.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सिया-चेतनने रचला होता ‘मास्टरप्लॅन’
तपासादरम्यान समोर आले की, चेहरा लपवून जाणारा दुसरा कोणी नसून सियाचा प्रियकर चेतन चौधरी होता. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी चेतनने आपला स्वतःचा मोबाईल घरीच ठेवून दिला होता, जेणेकरून त्याचे लोकेशन लोहगड परिसरात दिसणार नाही. त्याऐवजी त्याने त्याच्या एका कर्मचाऱ्याचा मोबाईल सोबत आणला होता आणि तो त्याद्वारे सियासोबत व्हॉट्सॲपवर संपर्कात होता. हा संपूर्ण कट पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अत्यंत पद्धतशीरपणे रचण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

आलिशान लग्न आणि चार्टर्ड विमानांची तयारी, पण मनात भलतेच!
पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन आणि सियाचा साखरपुडा अत्यंत थाटामाटात झाला होता. नोव्हेंबर महिन्यात राजस्थानमधील एका भव्य पॅलेसमध्ये त्यांच्या ‘डेस्टिनेशन वेडिंग’चे नियोजन होते. एवढेच नव्हे तर, वर आणि वधूपक्षाकडील पाहुण्यांना नेण्या-आणण्यासाठी चक्क दोन विशेष विमानांचे बुकिंगही करण्यात आले होते.
परंतु, या सर्व तयारीच्या मागे सियाचे चेतनसोबत प्रेमसंबंध सुरूच होते. सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. हे लग्न मोडण्यासाठी आणि केतनला वाटेतून हटवण्यासाठी तिने चेतनच्या मदतीने अनेक आठवड्यांपूर्वीच हा कट रचायला सुरुवात केली होती.
बाली ट्रिप रद्द करण्यासाठी केतनचा पासपोर्ट चोरला!
या कटाचा एक भाग म्हणून या महिन्याच्या सुरुवातीला केतन आणि सियाची इंडोनेशियातील ‘बाली’ येथे एक प्री-वेडिंग ट्रिप आयोजित करण्यात आली होती. दोघेही मुंबई विमानतळावर पोहोचले होते, मात्र तिथे पोहोचल्यावर अचानक केतनचा पासपोर्ट गहाळ झाल्याचे समोर आले आणि त्यांना परत यावे लागले.
“आमच्या तपासात निष्पन्न झाले आहे की, सियाला केतनसोबत बालीला जायचे नव्हते. त्यामुळे तिनेच विमानतळावर जाण्यापूर्वी केतनचा पासपोर्ट लपवून ठेवला होता, जेणेकरून ही ट्रिप रद्द व्हावी,” अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिली.
लोहगडची निवड अपघाती नव्हती; आधी दोनदा केली होती ‘रेकी’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनला मारण्यासाठी लोहगड किल्ल्याची निवड अचानक करण्यात आली नव्हती. १८ जूनच्या आधी सियाने केतनला दोन वेळा लोहगडावर नेले होते. एक प्रकारे ही त्या जागेची ‘रेकी’च होती.
३१ मे: सिया केतनला घेऊन पहिल्यांदा लोहगडावर गेली.
४ जून: तिने पुन्हा केतनला गडावर बोलावले होते, मात्र काही कारणास्तव केतन जाऊ शकला नाही.
१४ जून: सियाने पुन्हा केतनला लोहगडावर नेऊन परिसराची पाहणी केली.
१८ जून (घटनेचा दिवस): ठरलेल्या कटानुसार, चेतन चौधरी हा केतन आणि सिया पोहोचण्यापूर्वीच लोहगडावर जाऊन दबा धरून बसला होता. केतन आणि सिया गडावर चढल्यानंतर चेतनने त्यांचा पाठलाग केला आणि एका निर्जन कड्यावरून दोघांनी मिळून केतनला खाली ढकलून दिले. पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
