पुण्याकरिता अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या दोन रस्त्यांचं काम सुरु करण्यात आलं आल्याची महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्यापैकी एक म्हणजे पुणे बंगळुरु महामार्ग. “पुणे बंगळुरु हा नवीन ग्रीन हाय-व्हे एक्सीस कंट्रोल आम्ही बांधत आहोत. या रस्त्यावर नवं पुणं विकसीत करण्याचा विचार करा. जेणेकरून पुण्याचं कंजेशन कमी होईल”, असा सल्ला नितीन गडकरी यांनी आज (२४ सप्टेंबर) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना दिला आहे. लवकरच, आम्ही या महामार्गाचं प्रेझेंटेशन महाराष्ट्र सरकारला देऊ आणि कामाला सुरुवात करू असं गडकरी यांनी सांगितलं आहे. हा महामार्ग पुण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल असा दावाच नितीन गडकरी यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीन गडकरी यांनी यावेळी पुण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या आणखी एका महामार्गाची माहिती दिली आहे. “दक्षिणेतील म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ याचं उत्तरेतील म्हणजे पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, दिल्ली, हिमाचल, उत्तराखंड येथील सगळं ट्राफिक मुंबईहून पुण्याला येतं. आम्ही ठरवलंय की हे सगळं ट्राफिक सुरतलाच थांबवू. त्यानंतर, सुरतपासून नाशिक, नाशिकहून अहमदनगर, अहमदनगरहून सोलापूर, सोलापूरहून अक्कलकोट, गुलबर्गा, यादगीर, कर्नुल आणि चेन्नई असा हा महामार्ग १२७० किलोमीटरचा असेल. ह्यावर आम्ही ४० हजार कोटी रुपये खर्च करणार आहोत. यामुळे, मुंबई-पुण्याचं हे सगळं ट्राफिक कमी होईल”, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.

या प्रकल्पाचा महाराष्ट्राला मोठा फायदा!

“मुंबई पुण्यासह ठाणे, कोल्हापूर, सोलापूरचं देखील दक्षिणेतील सगळं ट्राफिक कमी होईल आणि प्रदूषणही कमी होईल. या महामार्गामुळे चेन्नईकडे जाणारी देखील सगळी वाहतूक बदलणार आहे. हा ग्रीन महामार्ग आहे. याची सध्याची लांबी १६०० किलोमीटर इतकी आहे. ती कमी होऊन १२७० किमी होईल. म्हणजेच या रस्त्याची महाराष्ट्रातून जाणारी ५०० किलोमीटर लांबी कमी होणार आहे. यामुळे नवीन दिल्ली-चेन्नई प्रवासात ८ तासांची बचत होणार आहे. या प्रकल्पाचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल”, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Develop new pune on pune bangalore highway nitin gadkari advice to ajit pawar gst
First published on: 24-09-2021 at 14:00 IST