पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर असून त्या विषयी राज्य शासनाकडून सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी बुधवारी व्यक्त केला. यासंदर्भात, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीत आपलाही समावेश असून समितीच्या माध्यमातून शहरवासीयांची बाजू मांडू, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. नदीसुधार योजनेत पुणे व पिंपरी-चिंचवडचा एकत्र प्रकल्प राबवावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
पिंपरी पत्रकार संघ आयोजित वार्तालाप कार्यक्रमात आयुक्तांनी गेल्या चार महिन्यांतील कामांचा आढावा घेतानाच आगामी नियोजनाविषयी सविस्तर माहिती दिली. संघाचे अध्यक्ष जयंत जाधव, सचिव अश्विनी सातव उपस्थित होते. चांगले व स्वच्छ रस्ते, पर्यटन केंद्र म्हणून शहराची ओळख, वाढीव पाणीसाठा, सुरक्षित बीआरटी, नागरी सुविधा केंद्रांची उभारणी, सारथीची वाढणारी व्याप्ती, शालेय व आरोग्यविषयक सुधारणा, अतिक्रमणुक्त व हिरवाईचे शहर, देहू तसेच खडकी कॅन्टोमेन्ट हद्दीतील रस्त्यांचा विकास आदी विविध विषयांवर आयुक्तांनी आपली भूमिका मांडली. अनधिकृत बांधकामाविषयी आयुक्त म्हणाले, अनधिकृत बांधकामप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या १४ जणांच्या समितीत आपलाही समावेश आहे. समितीत अनेक मुद्दय़ांचा सर्वागीण विचार होणार आहे. ही समिती शासनाला अहवाल देणार असून त्यानुसार पुढील निर्णय होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी वेळप्रसंगी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावू, असे सूतोवाच यापूर्वीच केले आहे. हा विषय केवळ पिंपरी-चिंचवड शहरापुरता मर्यादित नाही. मात्र, समितीच्या माध्यमातून शहरवासीयांची बाजू मांडू, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.
 
‘युनिवर्सल पार्क’ च्या धर्तीवर दुर्गादेवीचा विकास
बंद नळयोजनेसंदर्भात २५ जूननंतर बैठक होणार असून सर्वाना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ. बीआरटी रस्ते सुरक्षित असावेत, याची खबरदारी घेऊ. चहुबाजूने शहराची वाहतूक व्यवस्था विकसित करणार आहे. लॉस एंजलीन्सच्या युनिवर्सल पार्कच्या धर्तीवर दुर्गादेवी टेकडी परिसर विकसित करणार असून तळवडे, पुनवळे, चिखली, मोशी येथील गायनरानात हरित उद्याने विकसित करण्यात येणार असल्याचे आयुक्त राजीव जाधव यांनी सांगितले.