पुणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील पुढील दहा वर्षांतील कामकाजाचे नियोजन करण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर १३ तालुक्यांतील प्रत्येकी एका गावात हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. गावांच्या विकासासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत पुढील दहा वर्षांच्या कामांचा नियोजनबद्ध आराखडा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार असल्याने लवकरच गावांचा कायापालट होणार आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागात रोजगाराच्या माध्यमातून ग्रामपातळीवर शाश्वत विकास व्हावा, बेरोजगारांना रोजगार मिळावा. जल, जंगल, माती संवर्धनाबरोबर गावांमध्ये विहिरी, शेती, तळे, शेतीसुधारणा, पर्यटन विकास यांसारखी कामे होऊन गावे समृद्ध व्हावी, या उद्देशाने ग्रामपंचायत स्तरावर ‘दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखडा’ हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

याबाबत बोलताना रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी डॉ. वनश्री लाभशेटवार म्हणाल्या, ‘जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर १३ तालुक्यांमधील एका गावाची निवड करून ग्रामपातळीवर पाणंद रस्त्यांपासून, शेततळे, नाला सरळीकरण, जलसंधारण, पडीक जमिनीवर वृक्ष लागवड करणे, तलावातील गाळ काढणे, गुरांचा गोठा, शासकीय बांधकाम, फळबाग-रेशीम-तुती लागवड, सिंचन विहिर, शोषखड्डे, अंगणवाडी शाळा, घरकुल विकास योजनेतील कामे, भौतिक विकासासंदर्भातील तब्बल २६२ प्रकारची कामे करण्यासाठीचे नियोजन सुरू आहे. यापैकी काही कामांना सुरुवात करण्यात आली आहे.’

खासकरून रोहयोतून वैयक्तिक लाभाच्या योजनांना सर्वात जास्त मागणी असली, तरी त्यातून गावचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच स्थानिक पातळीवरच रोजगार प्राप्त होत असून ग्रामसेवक, तलाठी, गट विकास अधिकारी यांनी वेळोवेळी ग्रामसभा घेण्यात येत आहेत. तसेच दर चार दिवसांनंतर आढावा बैठक घेऊन कामांचा देखील आढावा बैठका घेण्यासंदर्भातही आदेश दिले आहे, असेही डॉ. लाभशेटवार यांनी सांगितले.

प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्पासाठी निवडलेली गावे

आंबेगाव – आहुपे, भोर – सालुंघन, जुन्नर – आंबी, बारामती – जळगावसुपे, इंदापूर – जाधववाडी, दौंड -खोर, खेड – मोरगीरी, मावळ – शिळींब, मुळशी – भांबर्डी, पुरंदर – कोंदे, शिरूर – खैरेनगर, वेल्हा – कोळंबी आणि हवेली – आळंदी म्हातोबा.

गावांचा विकास व्हावा, सुविधा पोहोचाव्यात, स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा हा हेतूने दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखडा प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू असणाऱ्या १३ गावांचा आढावा घेऊन हळूहळू विकासाच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील १४०० ग्रामपंचायतींमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.  – डॉ. वनश्री लाभशेटवार, उपजिल्हाधिकारी, रोहयो