ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा यांचे मंगळवारी पुण्यात निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. हृद्यविकाराच्या झटक्याने सोमवारी रात्री उशीरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर पुण्याच्या येरवडा येथील स्मशानभूमीत दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.
फोटो गॅलरी: हरहुन्नरी अभिनेते देवेन वर्मा काळाच्या पडद्याआड
हिंदी चित्रपटसृष्टीत ‘अंगूर’, ‘खट्टामिठा’ या चित्रपटांमधील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत विनोदी भूमिका अतिशय खूबीने वठवल्या. विनोदाचे टायमिंग साधण्यात हातखंडा असलेल्या देवेन यांना ‘चोरी मेरा काम’, ‘चोर के घर चोर’ आणि ‘अंगूर’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट हास्यकलाकाराच्या श्रेणीत सन्मानित करण्यात आले होते. देवेन वर्मा यांनी १४९ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. ‘दोस्त असावा तर असा’, ‘हा खेळ सावल्यांचा’ या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले होते. त्यांनी स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु करत काही चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शनही केले होते. सिनेसृष्टीतून निवृत्ती स्वीकारल्यानंतर ते पुण्यात वास्तव्याला होते.



