पुणे : कृषी क्षेत्रातील विविध संशोधन आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी पुढील वर्षापासून पुणे ॲग्री हॅकेथॉनच्या धर्तीवर राज्यस्तरावर महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील प्रथम पुरस्कार अजित पवार यांच्या नावाने देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कृषी विभागाच्या वतीने कृषी महाविद्यालय येथे आयोजित दुसऱ्या ‘पुणे ॲग्री हॅकेथॉनच्या समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, हेमंत रासने, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील या वेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेती अधिक शाश्वत, तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम करण्यासाठी आधुनिक संशोधन व नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी व्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत. पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल. तसेच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने दिला जाईल.

पुणे ॲग्री हॅकेथॉनमधील निवडक १८ नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यापैकी किमान १२ प्रकल्प बाजारात यावेत म्हणून राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे.

स्पर्धेतील विभागांनुसार विजेते

  • मृदा आरोग्य व व्यवस्थापन
    विजेता : किसान साथी
    उपविजेता : नॅनो वीटा
  • स्मार्ट जल व्यवस्थापन व स्वयंचलन
    विजेता : आयओएच अभियंता समूह
    उपविजेता : फार मोअर
  • कृषी यांत्रिकीकरण (कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव तंत्रज्ञान)
    विजेता : एग्रीटेक नेक्सस
    उपविजेता : टीम व्हीएनएमकेव्ही
  • कृषी प्रक्रिया व मूल्य साखळी
    विजेता : विन विन बाईट्स
    उपविजेता : सिल्कस्कॅन इनोव्हेटर्स
  • अक्षय ऊर्जा व कृषी कचरा व्यवस्थापन
    विजेता : प्रोटो फीड्स
    उपविजेता : इको एक्सट्रॅक्ट
  • पीक संरक्षण व कीड व्यवस्थापन
    विजेता : स्मार्ट बायो डिलिव्हरी
    उपविजेता : कृषी नेत्र
  • हवामान अनुकूल व डिजिटल शेती
    विजेता : डीप अँग बॉट
    उपविजेता : मॉडर्न व्हिलेज फ्यूचर इनोव्हेशन्स
  • भूस्थानिक व भौगोलिक माहिती प्रणाली आधारित पीक सर्वेक्षण व्यवस्था
    विजेता : क्रॉप जेन एआय
    उपविजेता : ग्रीन माइंड्स
  • स्मार्ट कृषी प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
    विजेता : ई-पिक ऑडिट एआय
    उपविजेता : कृषी प्रबंध