विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रशिया-युक्रने युद्धामुळे तयार झालेल्या परिस्थितीवर बोलताना मोदी सरकारचं तोंडभरून कौतुक केलं. “अमेरिकेने भारतावर दबाव आणला तेव्हा भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं की आम्हाला भारताचं हित पाहायचं आहे, अमेरिकेचं हित पाहायचं नाही,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ते मंगळवारी (१९ एप्रिल) पुण्यात ‘भाजपा : काल आज आणि उद्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जगाच्या पाठीवर युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू असताना अमेरिकेने दबाव आणला. तेव्हा अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून भारताचे परराष्ट्रमंत्री सांगतात की आम्हाला भारताचं हित पाहायचं आहे, अमेरिकेचं हित पाहायचं नाही. त्याचवेळी मोदींच्या नेतृत्वात रशियाला देखील असं वाटतं की रशिया आणि युक्रेनमध्ये कोणी मध्यस्थी करू शकत असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात.”

“आपल्याला विश्वावर राज्य करायचा नाही, तर…”

“भारतात गरीब कल्याणाचा अजेंडा राबवत एक परिवर्तन मोदींनी सुरू केलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादाचा शाश्वत विचार या दोन गोष्टींवर हा भारत पुढे जाईल. भारत विश्वगुरू झाला पाहिजे हे आपलं स्वप्न आहे. आपल्याला विश्वावर राज्य करायचा नाही, तर विश्वाला विचार द्यायचा आहे. तो विचार देणारा भारत निश्चितपणे तयार होऊ शकेल. त्यासाठी भाजपा हे उपकरण असेल,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा : “आमच्या पोलखोल यात्रेच्या बसवर दगडफेक होणं अपेक्षितच, कारण…”, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

“भाजपात काम करण्याची संधी यापेक्षा जीवनात काहीच असू शकत नाही”

“भारतात जन्म आणि भाजपात काम करण्याची संधी यापेक्षा जीवनात काहीच असू शकत नाही. ते आम्हाला सर्वांना मिळालं. त्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.