राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (२१ मे) पुण्यात ब्राह्मण संघटनांची बैठक बोलावली आहे. यात राज्यातील निर्माण होत असलेल्या जातीय तेढाच्या वातावरणाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार यांना इतक्या वर्षांनी ब्राह्मणांची आठवण झाली याचा आनंद आहे,” असा खोचक टोला फडणवीसांनी पवारांना लगावला. ते बारामतीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आनंद आहे, शरद पवार यांना इतक्या वर्षांनी ब्राह्मणांची आठवण आली. कोणीही बैठक बोलावली तरी सर्वांना बैठक बोलावण्याचा अधिकार आहे. कोणत्याही समाजाला बोलावण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मला वाटतं त्याकडे फार नकारात्मकतेने पाहण्याची आवश्यकता नाही.”

“इतक्या वर्षांनी शरद पवारांना ब्राह्मणांची आठवण आली”

“इतक्या वर्षांनी त्यांना ब्राह्मणांची आठवण आली आहे, तर मला वाटतं त्यांनी ती बैठक जरूर करावी. काहीच अडचण नाही,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

ब्राह्मण महासंघाने नाकारले शरद पवार यांच्या बैठकीचे निमंत्रण

ब्राह्मण महासंघाने मात्र बैठकीचे निमंत्रण नाकारले असून शरद पवार यांनी मंत्री छगन भुजबळ आणि अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानांबाबत आधी भूमिका जाहीर करावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या पुढाकारातून ही बैठक मार्केटयार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालय येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या बैठकीला २० ते २२ ब्राह्मण संघटना उपस्थित राहणार आहेत. बैठकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीने बैठकीला येणाऱ्यांना आपल्याबरोबर पेन आदी वस्तू आणण्यास मनाई करण्यात आली आहे. या बैठकीनंतर राज्यातील तणावपूर्ण वातावरण निवळेल, असा दावा प्रदीप गारटकर यांनी केला.

हेही वाचा : मोठी बातमी! शरद पवार यांचा राज्यसभेसाठी संभाजीराजेंना पाठिंबा, विजयाचा फॉर्म्युला सांगत म्हणाले…

दरम्यान, राजकीय पक्ष समाजातील प्रत्येक घटकाबरोबर काम करत असतो. सध्या राज्यातील राजकीय वातावरण काहीसे दूषित झाले आहे. राष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान असलेल्या ब्राह्मण समाजाच्या मनातील गैरसमज दूर करणे हा या बैठकीचा उद्देश आहे. राज्यातील बहुतांश ब्राह्मण संघटनांना त्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. काही संघटना राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांना यामध्ये राजकारण वाटत आहे. मात्र संवाद साधणे आणि समाजातील वातावरण सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून केला जाणार आहे, असे आयोजक, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis comment on sharad pawar meeting of brahman organizations in pune pbs
First published on: 20-05-2022 at 23:05 IST