विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेत निलंबित खासदारांवर टीका करताना सावरकराच्या मुद्द्यावर शिवसेनेला लक्ष्य केलंय. “संसदेत दंगा करणाऱ्या १२ खासदारांनी माफी मागायला आम्ही काय सावरकर आहोत का? असं म्हटलं. अरे निर्लज्जांनो ज्या सावरकरांनी अंदमानात कोलुचा बैल बनून शिक्षा भोगली त्याच्याबद्दल बोलत आहात,” असं मत व्यक्त केलं. तसेच सावरकरांवरील चिखलफेकीत शिवसेनेचाही सहभाग होता, असा आरोप फडणवीसांनी केला. ते पुण्यात शहर भाजपाच्या नवीन इमारतीतील मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “परवा संसदेत दंगा करणाऱ्या १२ खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यामध्ये शिवसेनेचे दोन खासदार होते. निलंबित खासदारांना संसदेची माफी मागणार का असं विचारलं. यावर निलंबित खासदार म्हणाले माफी मागायला आम्ही काय सावरकर आहोत का? अरे निर्लज्जांनो ज्या सावरकरांनी अंदमानात कोलुचा बैल बनून शिक्षा भोगली त्यांच्याबद्दल असे बोलता. भ्रष्टाचाराने कमावलेल्या पैशातून बांधलेल्या महालात राहणाऱ्यांनी सावरकरांवर चिखलफेक केली आणि तुम्ही त्यात सहभागी होता.”

“होय, आम्ही हिंदुत्ववादी आहेत, होय आम्ही सावरकरवादी आहोत”

“मला आता भगवा फडकणार असं आवर्जून सांगावं वाटतं. कारण भगव्याची शपथ घेतलेल्यांना त्याची लाज वाटतेय. होय, आम्ही हिंदुत्ववादी आहेत, होय आम्ही सावरकरवादी आहोत,” असंही फडणवीसांनी नमूद केलं. तसेच आता पुण्यात शिवसेना नावालाही उरलेली नाही. पुणेकर विकासाच्या मागे जाणार आहेत. पुन्हा महापालिकेत सत्ता मिळाल्यावर पुण्याला देशातील सर्वोत्तम शहर बनवल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; म्हणाले, “एका महत्त्वाच्या विषयाकडे…”!

“आता नेते आणि नोकरशाहा जिल्ह्याजिल्ह्यामध्ये खंडणीचं काम करत आहेत”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय, तर दुसरीकडे महाराष्ट्रात वसुली हा एकमेव धंदा आहे. वसुलीशिवाय काहीच होत नाही. भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला आहे. इथली नोकरशाही संपुष्टात येत आहे. महाराष्ट्राच्या नोकरशाहीला देशातील सर्वोत्तम नोकरशाही म्हटलं जायचं. त्या नोकरशाहीला राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराने पोखरून टाकलं. आता नेते आणि नोकरशाहा जिल्ह्याजिल्ह्यामध्ये खंडणीचं काम करत आहेत आणि सामान्य माणसाचा विचार करायला कुणी तयार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात वसुली सुरू आहे.”

“कोविड काळात राज्य सरकार कुठे होतं?”

“कोविडच्या काळात पुण्यात आमच्या महानगरपालिकेने पुणेकरांकरता रस्त्यांवर येऊन काम केलं. सामान्य पुणेकरासाठी आमची महानगरपालिका जागरूक होती. त्याचवेळी राज्य सरकार कुठे होतं? राज्य सरकारने काय मदत केली. राज्य सरकारने कोविडसाठी पुणे महानगरपालिकेला कोविडकरता एक नव्या पैशाचं अनुदान दिलं नाही. असं असताना आमच्या महानगरपालिकेने सांगितलं आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. या काळात महापौरांसह आमचे सर्व पदाधिकारी जनतेसाठी रस्त्यावर होते,” असं फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; म्हणाले, “एका महत्त्वाच्या विषयाकडे…”!

फडणवीस म्हणाले, “मोदींनी आवाहन केलं होतं एकही माणूस उपाशी झोपला नाही पाहिजे. त्या सर्वांपर्यंत भाजपाचे कार्यकर्ते शिधा पोहचवण्याचं काम करत होते. भाजपा केवळ निवडणुका जिंकण्याचं यंत्र नाही, तर सेवेचं एक संघटन आहे असं आमचे नेते मोदींनी सांगितलं होतं. सेवेच्या माध्यमातून देश उभा करण्यासाठी हा पक्ष तयार झाला. जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा पक्ष म्हणून आज भाजपाला मान्यता मिळाली आहे.”