पुणे : ‘मंत्र्यांना प्राप्त होणारी निवेदने संबंधित खात्याकडे पाठविली जातात. मात्र, त्या निवेदनावर केवळ मंत्र्यांच्या इच्छेनुसार निर्णय होत नाहीत. संबंधित खाते नियम आणि कायद्यानुसार त्यावर कार्यवाही करते,’ असे स्पष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पाठराखण केली.मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी बावनकुळे यांच्यावर कुणबी प्रमाणपत्रे रद्द केल्याचा आरोप केला होता. त्याबाबत मुख्यमंत्री पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ‘या प्रकरणात मंत्री बावनकुळे यांनी जाणीवपूर्वक काहीही केलेले नाही. त्यामुळे या मुद्द्यावरून त्यांना लक्ष्य करणे योग्य नाही. त्यांनी कोणाचेही प्रमाणपत्र रद्द केलेले नाही,’ असे फडणवीस यांनी नमूद केले.
ते म्हणाले, ‘सरकार दबावात किंवा नियमबाह्य पद्धतीने नव्हे, तर राज्यघटनेप्रमाणे चालते. सरकार सर्वांचे म्हणणे ऐकून घेते. मागणी कायद्याच्या चौकटीत असेल, तरच तिचा विचार केला जाईल. बावनकुळे मंत्री म्हणून योग्य काम करत आाहेत.’‘पालघरमधील दुग्धविकास प्रकल्पासाठी गेल्या ४० वर्षांपासून राखीव असलेली जागा दुग्धविकास विभागाला आवश्यक नसल्याने ती उद्योग विभागाला देण्याचा निर्णय घेतला. या जागेचे पैसे त्या वेळीच दिले आहेत. मात्र, स्थानिकांच्या काही समस्या असतील, तर त्या समजून घेतल्या जातील,’ असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेला उत्तर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करताना वापरलेल्या ‘गुंगी गुडिया’ या शब्दप्रयोगाबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘एखाद्या महिलेच्या कर्तृत्वावर टीका करणे योग्य नाही. अजित पवार यांच्या पश्चात उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार सक्षमपणे काम करत आहेत. त्यांच्या कामातून विरोधकांना उत्तर मिळत आहे.’
