पुणे : अनेक कंपन्यांनी चालकविरहित मोटारी (ड्रायव्हरलेस कार) सादर केलेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त असलेल्या देशांमध्ये हा पर्याय उपयोगी ठरू शकतो. मात्र, भारतासारख्या देशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक असून, वाहन चालविणे हे रोजगाराचे एक साधन आहे. त्यामुळे इथे चालकविरहित मोटारी आणू नयेत आणि आणल्याच तर त्या शेवटचा पर्याय म्हणून असाव्यात, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगातील आघाडीच्या कार कंपनीच्या नेतृत्वासमोरच मांडली.

ह्युंडाई मोटार इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) कंपनीच्या तळेगाव येथील अत्याधुनिक प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. दक्षिण कोरियाचे राजदूत ली सेओंग-हो, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, ह्युंडाई मोटार ग्रुपचे (एचएमजी) कार्यकारी अध्यक्ष युसन चंग, ‘एचएमजी’चे उपाध्यक्ष जेहून चांग, ह्युंडाई मोटार कंपनीचे अध्यक्ष व मुख्याधिकारी होजे मुनोज आणि ‘एचएमआयएल’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी तरुण गर्ग आदी या वेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘ह्युंडाई मोटार इंडियाने भारतात तीस वर्षे पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्रात पाऊल ठेवले आहे. मात्र, पुढील तीस वर्षांचा त्यांचा इतिहास महाराष्ट्रातील पुणे शहराभोवती फिरेल. इथेच मोटारींची रचना आणि उत्पादन होऊन त्यांची विक्री जगभरात होईल. राज्य सरकार ह्युंडाईच्या भविष्यातील वाढीच्या प्रवासाला पूर्ण सहकार्य करेल. दक्षिण कोरियातील सर्व उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी. सरकारकडून त्यांच्यासाठी एक खिडकी योजनेद्वारे सर्व सुविधा दिल्या जातील.

तळेगावमधील प्रकल्पाची वैशिष्ट्ये

प्रकल्पाची सध्याची वार्षिक उत्पादनक्षमता एक लाख ७० हजार मोटारी असून, २०३०पर्यंत ही क्षमता ३ लाख २० हजार मोटारींवर जाईल. जागतिक पातळीवर ह्युंडाई मोटारच्या सर्वांत प्रगत उत्पादन केंद्रांपैकी एक असलेला पुणे प्रकल्प ‘इंडस्ट्री ४.०’ तत्त्वांवर उभारण्यात आला आहे. प्रगत डिजिटल उत्पादन व्यवस्था, देखभाल पूर्वसूचना, डिजिटल सिम्युलेशन्स आणि कर्मचाऱ्यांसाठी इमर्सिव्ह ऑगमेंटेड रिॲलिटी आधारित प्रशिक्षण आणि कृत्रिम प्रज्ञा (एआय) आधारित कामकाज यांचा समावेश या प्रकल्पात आहे.

ह्युंडाई मोटारकडून महाराष्ट्रात ११ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यातील ७ हजार कोटी रुपये आतापर्यंत गुंतविण्यात आले असून, उर्वरित ४ हजार कोटी रुपये २०३०पर्यंत गुंतविण्यात येतील. कंपनीशी संबंधित पुरवठा साखळीतील लघु व मध्यम उद्योगांनी ४ हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, त्यातून १८ हजार रोजगार निर्माण झाले आहेत. – तरुण गर्ग, व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी, ह्युंडाई मोटार इंडिया