पिंपरी : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे गंभीर आजारी असतानाही विधानपरिषदेच्या अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत मतदानासाठी पीपीई कीट घालून आणि कार्डियाक रुग्णवाहिकेतून मुंबईला आले. त्यांनी मतदान केले. हा दिवस मी कधीच विसरु शकत नाही. या निवडणुकीनेच राज्यातील सत्ता बदलाची मुहूर्तमेढ केली. या निवडणुकीनंतर १५ ते २० दिवसांमध्येच महाराष्ट्रात आपण सत्ता बदल केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

चिंचवडचे भाजपचे आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या पिंपळेगुरव येथील ‘शक्तिस्थळ’ या प्रेरणा केंद्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (गुरुवारी) लोकार्पण झाले. त्यानंतर झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, बापू पठारे, उमा खापरे, अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, विलास लांडे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी महापौर संजोग वाघेरे यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना सन २०२२ मध्ये अतिशय अटीतटीची राज्यसभेची, विधानपरिषदेची निवडणूक होती. या निवडणुकीनेच राज्यातील सत्ता बदलाची मुहूर्तमेढ केली. मी हा दिवस कधीच विसरु शकत नाही. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतांची आवश्यकता होती. मी अश्विनी जगताप, शंकर जगताप यांना फोन केला. मतांची आवश्यकता आहे. पण, मतापेक्षा लक्ष्मणभाऊंचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या असे मी सांगितले. मतदानासाठी आणण्यासारखी परिस्थिती असेल, डॉक्टर होकार देत असतील तरच तुम्ही त्यांना मतदानाला आणा, अन्यथा आणले नाही तरी हरकत नाही, असे मी सूचविले होते. माझ्या पक्षाला आवश्यकता आहे. त्यामुळे काही झाले, तरी मी जाईनच असे लक्ष्मण जगताप यांनी स्पष्टपणे सांगितले. पीपीई कीट घालून आणि कार्डियाक रुग्णवाहिकेत लक्ष्मण जगताप मुंबईला आले. मतदान केले. मी विरोधी पक्षनेता असतानाही मतदान केल्यानंतर मला म्हणाले मुख्यमंत्री साहेब तुम्हाला मुख्यमंत्री पाहण्यारिता मी याठिकाणी आलो. त्यानंतर १५ ते २० दिवसांमध्ये महाराष्ट्रात आपण सत्ता बदल केला.या निवडणुकीत मी मुख्यमंत्री होण्याचे लक्ष्मण जगताप यांचे स्वप्न देखील पूर्ण झाले. काळाच्या पलिकडचे पाहण्याची त्यांची सवय होती. त्या सवयीमुळे अनायस त्यांच्या तोंडून तुम्हाला मुख्यमंत्री पहायचे आहे. माझे मुख्यमंत्री तुम्हीच आहात. काही दिवसांनी ते खरे झाले, अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणावे, लक्ष्मण जगताप हे मातीतून तयार झालेले नेतृत्व होते. राजकीय वारसा पाठीशी नसताना स्वत:च्या भरवशावर नेतृत्व उभे केले. तरुण वयात राजकारणात प्रवेश केला. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. शहराला विकासाकडे, सामान्य नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे काम लक्ष्मण जगताप यांनी केले. औद्योगिकीकरणामुळे राज्याच्या विविध भागातील लोक पिंपरी-चिंचवडमध्ये आले. सर्व लोकांचा विश्वास त्यांनी संपादित केला. मिनी महाराष्ट्र म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख आहे. शहराचे आधुनिक रुप पहायला मिळत आहे. त्यात लक्ष्मण जगताप यांचे मोठे योगदान आहे. २०१७ मध्ये महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर शहराचा चेहरा बदलला. विकासाच्या विविध संकल्पना त्यांच्या ठायी होत्या. रस्ते, उड्डाणपूल, नदी सुधारण्याचे काम लक्ष्मण जगताप यांच्यामुळे सुरु झाली. लढवय्ये असल्याने दुर्धंर रोगाशीही लढाईही दिली. किती विपरित परिस्थिती आली, तरी ते विजयी व्हायचे आहे. त्यामुळे या आव्हानाचाही सामना करुन ते विजयी होतील, असा विश्वास होता. पण, एका सामान्यात इश आले नाही. मेट्रोचे काम सुरु आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना तयार केल्या आहेत. चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी काम केले आहे. लक्ष्मण जगताप यांच्या स्वप्नातले चेहर तयार केले जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.