पुणे : महाराष्ट्राची ओळख सध्या देशाचे वाहननिर्मिती केंद्र अशी असून, राज्याला भविष्यात गतिशीलता क्षेत्रातील जागतिक केंद्र बनविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’पासून ‘इनोव्हेट इन महाराष्ट्र’पर्यंतची वाटचाल करताना उत्पादनासोबत संशोधन, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान विकास आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
चाकण येथे मर्सिडीज-बेंझच्या अत्याधुनिक ‘इलेक्ट्रिक जीएलसी’ मोटारीच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजीच्या पर्यवेक्षकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मार्टिन ब्रुडरम्युलर, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष आणि जागतिक प्रमुख डॉ. ओला कॅलेनिअस, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तथा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. यॉर्ग बुर्जर, मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी संचालक संतोष अय्यर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वाहन उद्योगाचे मोठे जाळे विकसित झाले असून, देशातील एकूण वाहननिर्मितीत महाराष्ट्राचा वाटा २० टक्क्यांहून अधिक आहे. राज्याचे उद्दिष्ट केवळ वाहननिर्मितीपुरते मर्यादित नसून, विद्युत वाहने, बॅटरी तंत्रज्ञान, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, कृत्रिम प्रज्ञा (एआय), वाहनांची संगणकीय प्रणाली, रचना आणि संशोधन-विकास या क्षेत्रांतही जागतिक नेतृत्व मिळविण्याचे आहे. मर्सिडीज-बेंझने चाकणमधून भारतीय बाजारपेठेबरोबरच आशियाई आणि जागतिक बाजारपेठांसाठी वाहननिर्मिती करावी. तसेच भविष्यातील बॅटरी तंत्रज्ञान, संगणकीय प्रणाली आणि गतिशीलता संशोधनासाठी महाराष्ट्राला प्राधान्य द्यावे.’
विद्युत वाहनांमध्ये मोठी वाढ
‘राज्याच्या विद्युत वाहन धोरणांतर्गत २०३० पर्यंत नवीन वाहन नोंदणीमध्ये ३० टक्के विद्युत वाहनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महामार्गांवरील जलद चार्जिंग सुविधा, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि समृद्धी महामार्गावरील शाश्वत गतिशीलता कॉरिडॉर, तसेच बॅटरी पुनर्वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. भविष्यातील वाहन हे केवळ चार चाकांवर धावणारे वाहन नसून, संगणकीय प्रणाली, ऊर्जा प्रणाली आणि कृत्रिम प्रज्ञेसह मोबिलिटी प्लॅटफॉर्मचे एकत्रित स्वरूप असेल. या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यास महाराष्ट्र सज्ज आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुणे भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी सज्ज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात मर्सिडीज-बेंझ कंपनीचे गेल्या तीन दशकांपासून महत्त्वपूर्ण योगदान आहे. विद्युत वाहनांच्या स्थानिक उत्पादनाचा प्रारंभ हा राज्याच्या औद्योगिक विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे. विद्युत ऊर्जा, कृत्रिम प्रज्ञा आणि पर्यावरणपूरक उत्पादन तंत्रज्ञानाचा संगम असलेली ही निर्मिती पुणे भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी सज्ज असल्याचे दर्शवते. पुणे जिल्ह्यात जागतिक दर्जाचा विद्युत वाहन उद्योग आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राला भविष्यातील वाहतूक क्षेत्रात सक्षम करण्याचे .अजित पवार यांचे स्वप्न साकार होत आहे. आधुनिक गतिशीलता तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला पूरक आहे.
