पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा पोटनिवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले शैलेश टिळक यांची शुक्रवारी रात्री टिळक यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये बंद दरवाजा आड काही मिनिटे चर्चा झाली. फडणवीस यांच्या भेटीनंतर टिळक यांची ‘समजूत’ घातली की, स्थान पक्के केले, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश आणि चिरंजीव कुणाल इच्छुक आहेत. शहर भाजपकडूनही या दोघांची नावे प्रदेशला कळविण्यात आली आहेत. शैलेश टिळक यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू असतानाच पुण्यात कार्यक्रमासाठी आलेल्या फडणवीस यांनी शैलेश टिळक यांची भेट घेतली.