scorecardresearch

शिवसैनिकांच्या हल्ल्यात सोमय्या जखमी झाल्याने फडणवीस संतापून म्हणाले, “Z प्लस सुरक्षा असणाऱ्याला पोलीस सुरक्षा देऊ शकत नसतील तर..”

सोमय्यांवरील हल्ल्यासंदर्भात बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर निशाणा साधलाय.

devendra fadnavis kirit somaiya Khar
पुण्यात पत्रकारांशी बोलताना नोंदवली प्रतिक्रिया

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलीस स्थानकामधून भेटून येताना भाजपाचे नेते किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडलीय. या हल्ल्याच्या घटनेसंदर्भात पुणे विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केलाय. झेड दर्जाची सुरक्षा असणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेत अशी दिरंगाई होत असल्याबद्दल फडणवीस यांनी कायदा सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

नक्की वाचा >> “पोलीस आयुक्त उद्धव ठाकरेंचे नोकर आहेत का?, खून करण्याचा…”; हल्ल्यात जखमी झाल्यानंतर सोमय्यांची संतप्त प्रतिक्रिया

जाणीवपूर्वक त्यांच्यावर दगडफेक करायला
२४ तासांपूर्वी कंबोज यांच्यावर हल्ला, राणा दांपत्याला अटक आणि आता सोमय्यांच्या गाडीवर हल्ला. यासंदर्भात तुम्ही काही ट्विट केलेत तर त्याचा अर्थ काय असा प्रश्न पत्रकरांनी फडणवीस यांना विचारला. त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी, “आता प्रश्न एवढाच आहे किरीट सोमय्या हे झे प्रोटेक्टीव्ह आहेत. त्यांनी अधिकृतपणे पोलिसांना कळवलं होतं की मी पोलीस स्थानकामध्ये येत आहे. भेट झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना सांगितलं की ७०-८० ते १०० लोकांचा जमाव बाहेर आहे. तो जमाव माझ्यावर हल्ला करणार हे त्यांच्यातर्फे अधिकृतपणे कळवण्यात आलेलं. माझ्यावर असा हल्ला होणार आहे, पोलीस स्थानकाच्या आवारात होणार आहे त्यामुळे आधी तुम्ही क्लिअरन्स करा मग त्यानंतर मी बाहेर जाईन इतकं क्लिअरली सांगितल्यानंतरही पोलिसांनी यासंदर्भात कुठलीही कारवाई केली नाही उलट जाणीवपूर्वक त्यांच्यावर दगडफेक करायला तिथल्या स्थानिक लोकांना, शिवसैनिकांना, गुंडांना परवानगी दिली. म्हणजे एकूणच पोलिसांच्या संरक्षणामध्ये गुंडगर्दी चालली आहे,” असा संताप व्यक्त केला.

नक्की वाचा >> शिवसैनिकांच्या हल्ल्यात सोमय्या जखमी: “मी सरकाला इशारा देतोय की…”; गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याच सांगत फडणवीसांचा संताप

ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे
“खरं म्हणजे शरम वाटायला पाहिजे पोलिसांना की त्यांनी झेड प्लस प्रोटेक्टीव्हने माहिती दिल्यानंतरही त्यांना सुरक्षा देऊ शकत नसतील तर हा कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा आहे. मुंबई पोलिसांची अब्रू आता या पोलिसांनी घालवलीय. देशातील सर्वोत्तम पोलीस दल आज इतक्या दबावाखाली सरकारच्या नोकरासारखं वागतंय. लोकशाही पायाखाली तुडवली जातेय. ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे,” असंही फडणवीस म्हणाले.

सर्व निर्णय पायदळी तुडवून
“एवढचं नाही सगळी कलमं जामीनपात्र असतानाही देखील, रात्रीच्या वेळी एका महिलेला पोलीस कोठडीत जामीनपात्र गुन्ह्यामध्ये ठेवता येत नाही. माहिती असतानाही कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निर्णय पायदळी तुडवून त्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात येतयं. एकूणच हा सगळा प्रकार गंभीर आहे,” असं फडणवीस म्हणालेत. नवनीत राणांना सायंकाळी अटक झाल्यासंदर्भात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली

हे खपवून घेतलं जाणार नाही
तसेच पुढे बोलताना, “उद्या मी स्वत: यासंदर्भात म्हणजेच किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात गृह सचिव आणि गृहमंत्र्यांशी बोलणार आहे. त्यांना पत्र लिहिणार आहे. उद्या मागणी करणार आहे की या पोलिसांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, जे पोलीस राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे वागतायत. त्यांच्यासमोर त्यांच्या संरक्षणात जर अशाप्रकारचे हल्ले होत असतील तर हे खपवून घेतलं जाणार नाही,” असंही फडणवीस म्हणाले. तसेच, मी आज सरकाला इशारा देतोय की आम्हाला तुम्ही या ठिकाणी घाबरवू शकत नाही,” असंही फडणवीसांनी म्हटलंय.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis on kirit somaiya attacked in mumbai by shivsena supporters suffered minor injury svk 88 scsg

ताज्या बातम्या