पिंपरी : ‘भारतात अमली पदार्थ आणण्याचे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. अनेक देशांना भारताची प्रगती पहावत नाही. ते भारताशी लढूही शकत नाहीत. भारत शक्तीशाली देश आहे. त्यामुळे भारताच्या विरुद्ध छुपे युद्ध सुरु केले आहे. या युद्धाची सुरुवात पंजाबपासून झाली. त्यातून पंजाबमध्ये तयार झालेली परिस्थिती भारताच्या इतर राज्यात करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन तस्करी करुन अमली पदार्थ आणण्याचा प्रयत्न चालल्याचा आरोप’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पिंपरी येथे केला.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी ताथवडे येथे झालेल्या जागेच्या सातबारा उताऱ्याचे हस्तांतरण, कृत्रिम प्रज्ञा आधारित सीसीटीव्ही व आयटीएमएस प्रकल्पाचा शुभारंभ, पिंपरी पोलीस संकुलाचे भूमीपूजन, आधुनिक वाहने, साधनसामुग्रीचे लोकार्पण, नशामुक्त अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘काही रसायने एकत्रित करुन कृत्रिम (सिथेंटीक्स) अमली पदार्थ तयार करता येतात. घरांमध्ये अमली पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे. सिथेंटीक्स अमली पदार्थापासून तरुणाई संपत आहेत. व्यवसनाधीन झालेली तरुणाई पैशांसाठी गुन्हेगारीकडे वळते.
खून करण्यापासून आई-वडिलांना मारण्याच्या घटनाही पहायला मिळतात. त्यामुळे अमली पदार्थमुक्त करण्यासाठीचे आव्हान मोठे आहे. अमली पदार्थाच्या पुरवठ्यावर, मागणीवर नियंत्रण आणले जाणार आहे. व्यसनाधीन झालेल्यांना योग्य उपचार दिले जाणार आहेत. अमली पदार्थासाठी रसायन तयार करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवले जाईल. बाहेरुन येणारा माल सीमेवर अडविला जाणार आहे. पुरवठ्याची साखळी मोडून काढली जाणार आहे. बंद पडलेल्या कारखान्यातून अमली पदार्थाचा पुरवठा करण्याचा प्रयत्न होतो. बंद पडलेले रसायन निर्मिती कारखान्यांची तपासणी केली जाणार आहे’.
‘ही लढाई आपल्या घरी लढावी लागेल. आई-वडिलांनाही मुलांकडे लक्ष द्यावे लागेल. अमली पदार्थ विकणारा, घेणाऱ्याच्या पाठिशी कोण आहे, याचा शोध घेतला जात आहे. अमली पदार्थाचे कारखाने नेस्तानाबूत केले जाणार आहेत. खोकला झाल्यानंतर कोडीनयुक्त औषध नसेसाठी वापरले जाते. या औषधाचाही हिशोब ठेवला जात आहे. युवा शब्द उलटा केला तर वायू शब्द बनतो. वायू चक्रीवादळाच्या स्वरुपात आल्यास समाजाला उद्धवस्त करतो. तोच वायू प्राणवायू झाला तर जगण्याला मदत करतो. युवा शक्तीला प्राणवायूत परिवर्तीत करायचे झाल्यास त्याला शक्ती द्यावी लागणार आहे. स्वत:च्या घरापासून नशामुक्तीचे अभियान सुरु करण्याचे’ आवाहनही त्यांनी केले.
