पुणे : ‘भविष्यात देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे पंतप्रधान व्हावे, ही मनापासून इच्छा आहे. जनसंघाच्या काळात गंगाधरराव फडणवीस यांच्यासोबत राज्यभर घरचा डबा घेऊन पक्ष उभारणीसाठी केलेल्या संघर्षमय प्रवासाच्या अनेक आठवणी आजही ताज्या आहेत. गंगाधरराव यांची निष्ठा, जिद्द, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली बांधिलकी हेच गुण आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रकर्षाने दिसून येतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी रविवारी केले.

ईश्वरी प्रकाशनतर्फे संतोष गाजरे लिखित ‘देवाभाऊ’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी बाळासाहेब फडणवीस बोलत होते. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, महाराष्ट्र बँकेचे संचालक प्रसेनजित फडणवीस, व्याख्याते विशाल गरड, प्रकाशक संतोष धायबर, संदीप कद्रे या वेळी उपस्थित होते.

‘कायद्याच्या शिक्षणात त्यांनी सुवर्णपदक मिळविले होते. त्यांच्याकडे प्रभावी वक्तृत्व आहे. त्यामुळे ते भविष्यात राजकारणात मोठी भूमिका बजावतील. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नागपुरातील नामवंत वकिलांकडे अल्पावधीसाठी काम केले. मात्र, जनसंघाच्या विचारसरणीशी जोडल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ते घरात कधीही राजकारण करत नाही. भविष्यात त्यांना मोठी जबाबदारी मिळेल. जनसंघाच्या काळात गंगाधरराव फडणवीस यांच्यासोबत राज्यभर घरचा डबा घेऊन पक्ष उभारणीसाठी केलेल्या संघर्षमय प्रवासाच्या अनेक आठवणी आजही ताज्या आहेत. गंगाधरराव यांची निष्ठा, जिद्द, संघटनकौशल्य आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली बांधिलकी हेच गुण आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रकर्षाने दिसून येतात,’ असे बाळासाहेब फडणवीस यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘जलयुक्त शिवार, रखडलेले सिंचन प्रकल्प, शेततळी, पाणलोट विकास, ‘मिसिंग लिंक’, अटल सेतू आणि पूरनियंत्रण यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांमागे फडणवीस यांची दूरदृष्टी आहे. २०१७ मधील शेतकरी कर्जमाफीचा निर्णय त्यांनी एका रात्रीत घेतला. मराठा आरक्षणासाठी कायद्याचा सखोल अभ्यास करून तो न्यायालयात टिकेल अशी भक्कम तयारीही त्यांनी केली. अभ्यास, संवेदनशीलता, निर्णयक्षमता आणि सर्वसामान्यांशी कायम जोडलेले राहणे हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून योग्य वेळी अभिनंदन किंवा सांत्वन करणारा त्यांचा स्वभाव त्यांच्या संवेदनशीलतेची साक्ष देतो.’