पुणे : ‘विरोधकांच्या सत्यापलाचा मुकाबला करायचा असेल, तर ते वापरतात, तीच अस्त्रेही लागतील, शस्त्रेही लागतील आणि कार्यपद्धती त्यांच्यापेक्षा वरचढ लागेल,’ असा कानमंत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोमवारी दिला. ‘भाजपच्या विचारधारेला विरोध करण्याची विरोधकांची क्षमता संपल्यामुळे आता समस्या उकरून काढल्या जात आहेत. या खोट्या कथानकाविरोधात लढाई करण्यासाठी कार्यपद्धती बदलावी लागेल,’ असा संदेश त्यांनी दिला.
भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुण्यात झाली. या बैठकीच्या समारोपावेळी फडणवीस बोलत होते. पक्षाने युवा पिढीपर्यंत पोहोचण्यावर भर देण्यासाठी काय करायला हवे, याचाही उहापोह त्यांनी भाषणात केला. संज्ञापनाचे, संवादाचे माध्यम बदलले असल्याची जाणीव करून देतानाच फडणवीस यांनी, नवी कार्यपद्धती कशी असली पाहिजे, यावर टिप्पणी केली.
ते म्हणाले, ‘आजची पिढी सर्व माहिती मोबाइलवर वाचते, पाहते. त्यांचा कल ४० ते ६० सेकंदांत तयार केलेल्या बातम्या पाहण्याकडे दिसतो. या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे माध्यम ‘इन्स्टाग्राम’ आहे. बातम्यांची ४० टक्के वाहतूक या माध्यमावर होते. पण, आपल्यापैकी ९० टक्के लोक अजून फेसबुकमध्ये अडकले आहेत. फेसबुक किंवा व्हॉट्सॲप आवश्यक आहेच, पण खोट्या कथानकाचा मुकाबला करण्यासाठी अस्त्रेही तीच लागतील, शस्त्रेही तीच लागतील आणि कार्यपद्धती आणखी वरचढ लागेल.’
‘विरोधकांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीला विरोध केला. राम मंदिराला विरोध दर्शविला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावे लागले. विचारसरणीला विरोध करून उपयोग होत नाही, हे लक्षात आल्यामुळे त्यांनी राम मंदिरातील दानपेटीतील घोटाळ्याचा मुद्दा पुढे करून खोटे कथानक पसरविण्याचा प्रयत्न केला. विरोधकांचे पुढील लक्ष्य नाशिक येथे होणारा कुंभमेळा आहे. त्यामुळे विरोधकांचे पोपट कुंभमेळ्यातील कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आहेत,’ असे फडणवीस म्हणाले.
‘देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचे जगातील काही शक्तींना पाहवत नाही. भारताला वेळीच रोखले नाही, तर पुढे रोखता येणार नाही, हे माहिती असल्यामुळेच या शक्तींनी कार्यपद्धतीत बदल केला आहे. ते ज्यांचा वापर करत आहेत, त्यापैकी पाच टक्के लोकांना आपला वापर होत असल्याचे माहिती आहे. मात्र, ९५ टक्के लोकांना ते माहिती नाही. त्यामुळे अजाणतेपणे ते या शक्तींबरोबर जात आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले….
- ‘वंदे मातरम’ गीताहून मोठे मातृसत्ताक पद्धतीचे दुसरे कुठलेचे प्रतीक नाही.
- काँग्रेस आणि ‘यूपीए’मधील पक्ष महिला आरक्षणाचे मारेकरी.
- राहुल गांधी यांचा पुण्यातील कार्यक्रम ‘झूट की गूंज’.
- गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीने कसा साजरा करायचा, याचे उदाहरण पुण्याने घालून द्यावे.
‘काँग्रेसचा अराजक माजविण्याचा प्रयत्न’
‘काँग्रेसने नक्षलवादापासून स्फूर्ती घेऊन देशात अराजक माजविण्याचा विडा उचलला आहे. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अंतिम भाषणात अराजकतेचे संकट समजावून सांगतिले होते. आज तेच अराजकतेचे संकट राज्यघटनेचे नाव घेऊन भाजप विरोधात वापरण्याचा प्रयत्न आहे. हा वापर केवळ भाजपच्या विरोधात नाही, तर सर्व समाजाविरोधात आहे. राज्यघटनेचे नाव घ्यायचे आणि मूल्ये पायदळी तुडवून अराजकता पसरविण्याचे काम सुरू आहे. मात्र, राज्यघटनेचा दुरुपयोग करणाऱ्यांचे हात जळल्याशिवाय राहणार नाहीत,’ अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली.
‘सीजेपी’वर टीका
‘राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेवेळी एकत्र आलेल्या १८० संस्थांपैकी अनेकांवर अर्बन नक्षलवादाचा आरोप होता. या संस्थांना निवडणुका लढवायच्या नसतात. कुठलीही उत्तरे द्यायची नसतात. त्यामुळे ते रोज खोटे बोलतात. याच संघटना आता नवे नाव घेऊन उतरल्या आहेत. ‘सीजेपी’च्या मागेही याच संघटना आहेत. ‘सीजेपी’ म्हणजे ‘काँग्रेस जिताओ प्रोग्रॅम’ आहे,’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
