पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे बहुमत असतानाही पक्षाच्या कार्यक्रमांकडे, बैठकांकडे पदाधिकारी, नगरसेवकांचे होणारे दुर्लक्ष; तसेच पक्षांतर्गत गटबाजीमुळे निर्माण होणारे चित्र यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, पदाधिकारी, नगरसेवकांपासून थेट आमदारांना खडे बोल सुनावून, ‘पदे मागायला आलात, तर आधी ‘रिपोर्ट कार्ड’ काढणार,’ असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पुण्यात बैठक घेतली. भाजपचे पुणे महापालिका, पिंपरी- चिंचवड महापालिका, तसेच जिल्हा परिषदेतील सदस्य यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि पुणे व पश्चिम महाराष्ट्रातील आमदार बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत निवडणुकीसाठी झालेल्या कमी नोंदणीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करून उपस्थितांची झाडाझडती घेतली.

‘पक्षाने तुम्हाला नगरसेवक, पदाधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे. पक्षाचे काम करणे, सदस्यसंख्या वाढविणे ही तुमची जबाबदारी आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेसह जिल्ह्यात भाजपची सत्ता असतानाही नोंदणी कमी का झाली,’ अशी विचारणा करून शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारात स्थानिक नगरसेवकांच्या अनुपस्थितीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी देखील व्यक्त केली.

‘उद्या माझ्याकडे पद मागायला याल, तर सर्वांत आधी तुमचे ‘रिपार्ट कार्ड’ काढीन, तुम्ही किती आणि कसे काम केले, याचा आढावा घेईन आणि त्यानंतरच पुढचा विचार करीन,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी बैठकीत सुनावले. पक्षाचे अनेक पदाधिकारी, नगरसेवकांनी निवडणुकीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. पक्षांतर्गत सुरू असलेल्या कुरघोडीचा फटका भाजपच्या उमेदवाराला निवडणुकीत बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत स्वत: मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याचे ठरविले असून, बुधवारी त्यांनी घेतलेल्या बैठका आणि दिलेल्या सूचना त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे.

‘कोकणात होते, मग पुण्यात का नाही?’

नगरसेवक, पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत आगामी विधान परिषद निवडणुकीतील मतदानाचा मुद्दादेखील चर्चेला आला. ‘कोकण विभागात ८० टक्के मतदान होत असेल, तर पुणे शहरात तितके मतदान का होऊ शकत नाही,’ अशी विचारणा फडणवीस यांनी केली. ‘त्रुटी सुधारा, जास्तीत जास्त मतदान घडवून आणा,’ असे सांगून मुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांना मतदान वाढविण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले.

‘कानउघाडणी नव्हे, अपेक्षा व्यक्त’

‘नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली नाही, तर त्यांच्याकडून कोणत्या कामाची अपेक्षा आहे, हे सांगितले,’ असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. ते म्हणाले, ‘आपण जेव्हा निवडणूक लढवितो, त्या वेळी ती पूर्ण ताकदीने लढावी लागते. ही निवडणूक होऊन जाईल, असे लोकप्रतिनिधींना वाटत असते. परंतु, उलट याकडेच आपल्याला जास्त लक्ष द्यावे लागते. त्यामुळे प्रत्येक नगरसेवक, पदाधिकाऱ्याने यात सहभागी झाले पाहिजे. विधान परिषदेच्या पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील.’