दरवर्षी गणेशोत्सवाआधी संभाव्य ध्वनीप्रदूषणाचा आणि गणेशोत्सवादरम्यान डीजेच्या आवाजामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत येतो. डीजे अर्थात ध्वनीक्षेपक रात्री १० वाजेपर्यंत वाजवू द्यायचे की १२ वाजेपर्यंत? मिरवणुकीदरम्यान डीजे वाजवण्यासाठी अतिरिक्त वेळेची मुभा द्यावी की नाही? अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा पाहायला मिळते. पुण्यात हल्ली विद्यानंद बापट यांनी डीजेचा वापर व त्यामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा उचलून धरलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात त्यांची भूमिका मांडली आहे. पुण्यात भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांना डीजेच्या वापरासंदर्भात आवाहनदेखील केलं आहे.

डीजेबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पुण्यातील डीजेच्या वापराबाबत देवेंद्र फडणवीसांनी पुणेकरांना सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव सण साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. “पुण्यात गणेशोत्सवात डीजे वाजला पाहिजे की नाही? मी पुणेकरांना सांगू इच्छितो की पुण्यातच ही क्षमता आहे की संपूर्ण संस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा केला पाहिजे. हे फक्त पुणेकरच करू शकतात. त्यामुळे माझं पुणेकरांना आवाहन आहे की या वादात न पडता पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं पाहिजे की संपूर्ण संस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव कसा साजरा केला जातो”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले.

पुण्यात ठिकठिकाणी डीजेविरोधात आंदोलन

दरम्यान, पुण्यात गणेशोत्सवादरम्यान डीजेचा वापर करण्याविरोधात आंदोलनं होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सण कोणत्याही धर्माचा असला, तरी डीजेचा कर्णकर्कश्श्य आवाज नकोच, अशी भूमिका आंदोलक पुणेकरांनी घेतली असून यासंदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी पुणेकर करू लागले आहेत.

डीजे विरोधामुळे विद्यानंद बापट चर्चेत!

एकीकडे पुण्यात डीजेच्या वापराला वाढता विरोध चर्चेत असताना दुसरीकडे या विरोधाचा चेहरा बनत असणारे विद्यानंद बापटदेखील चर्चेत आले आहेत. कोणतीही राजकीय वा सामाजिक पार्श्वभूमी नसलेले ३७ वर्षीय विद्यानंद बापट हे बीपीओ क्षेत्रात काम करतात. पुण्यात गणेशोत्सवात डीजेचा वापर करण्याविरोधात विद्यानंद बापट यांनी ठामपणे मांडलेली भूमिका काही गणेश मंडळ कार्यकर्त्यांना न पटल्यामुळे यासंदर्भातील बैठकीतून बापट यांना बाहेर काढण्यात आलं. यावरून बैठकीतही जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर विद्यानंद बापट हे डीजेसंदर्भातील चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णींचा डीजेला विरोध

दरम्यान, पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी गणेशोत्सव व दहीहंडीसारख्या सणांवेळी डीजेच्या वापराला तीव्र विरोध केला आहे. “रस्त्यावर धांगडधिंगा केली तरच धार्मिकचा सिद्ध होते हे मला मान्य नाही. मोठ्या आवाजांचा लोकांना त्रास होतो. त्यामुळे गणेश मंडळांनी डीजे व स्पीकर्स टाळायला हवेत. आजारी माणसं, गरोदर महिला, लहान मुलं या सगळ्यांनाच डीजेच्या आवाजाचा त्रास होतो. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने हा उत्सव सुरू केला, तो उद्देशच हरवला आहे”, असं ठाम मत मेधा कुलकर्णी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मांडलं.