पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष नजरेचा प्रत्यय शनिवारी खानवडी येथील कार्यक्रमात आला. महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याबाबत छगन भुजबळ बोलल्यावर केवळ महिलांनी टाळ्या वाजवल्याचे निरीक्षण नोंदवत फडणवीसांनी आजही मानसिकता बदलण्याची गरज असून, महात्मा फुले यांच्या विचारांचा धक्का देण्याची गरज असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

पुणे जिल्हा परिषदेतर्फे खानवडी येथील ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात मंत्री, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार रावल, गृहराज्यमंत्री योगेश कदम, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, विधान परिषदेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हापरिषदेचे सभापती वीरधवल जगदाळे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमात भाषण करताना अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभेत महिलांना ३० टक्के आरक्षण दिले जाणार असल्याचा संदर्भ दिला. ते म्हणाले, महिलांना आरक्षण देणे ही महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना श्रद्धांजली ठरेल. महिलांना सत्तेतही वाटा मिळाला पाहिजे. महिला उपमुख्यमंत्री झाल्या, मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिल्या आयुक्त झाल्या.

सभागृहात एका बाजूला महिला आणि एका बाजूला पुरुष अशी बैठक व्यवस्था होती. याचा संदर्भ देत फडणवीस यांनी त्यांचे निरीक्षण नोंदवले. फडणवीस म्हणाले, महात्मा फुले यांचे विचार आजही कालसुसंगत आहेत. मोदीजींनी महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत ३० टक्के आरक्षण दिले आहे. छगन भुजबळ त्याबाबत बोलल्यावर केवळ महिलांच्या बाजूने टाळ्या वाजल्या. राजकीय क्षेत्रात आपली मानसिकता बदलण्यासाठी फुले यांच्या विचारांचा धक्का आवश्यक आहे.