पुणे : ‘राज्य सरकारने मराठा समाजासाठीच्या कोणत्याही योजना बंद केल्या नाहीत. उलट त्या अधिक ताकदीने राबवण्यात येत आहेत. मराठा समाजासाठी मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथ शिंदे यांनी जेवढे काम केले, तेवढे महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही सरकारमध्ये झाले नाही,’ असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केला.

पुणे ॲग्री हॅकेथॉनच्या समारोप समारंभानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘मराठा समाजासाठी राज्य सरकारने विविध आर्थिक आणि शैक्षणिक योजना सुरू केल्या आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उद्योजक, तर सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना प्रशासकीय सेवांमध्ये यश मिळावे म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, निर्वाह भत्ता आणि इतर योजनांच्या माध्यमातून मदत करण्यात येत आहे. मराठा समाजासाठीची कोणतीही योजना बंद करण्यात आली नाही. उलट त्या अधिक ताकदीने राबविण्यात येत आहेत.’

मराठा आरक्षणाशी संबंधित प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, ‘खूप प्रमाणपत्रे प्रलंबित आहे, असे नाही. नियमात बसणाऱ्या सगळ्यांनाच प्रमाणपत्रे दिली जात आहेत. त्याच्या वैधतेची प्रक्रिया मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार केली जाते. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयानेच समिची स्थापन केली असून, निकषही न्यायालयानेच ठरवले आहेत. त्यात हस्तक्षेप करता येत नाही. सातारा गॅझेटसंदर्भातील प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान होणार नाही, यादृष्टीने कायदा व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार सरकार काम करत आहे.’

दरम्यान, ‘शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकारची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक झाली आहे. काही अतिरिक्त माहिती मागविण्यात आली असून, ती प्राप्त झाल्यानंतर प्रक्रिया सुरू केली जाईल. मात्र, ३० जूनपूर्वीच कर्जमाफी करण्यात येणार आहे,’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांद्याची निर्यात होत नाही. बांगलादेश आणि आखाती देशांमध्ये आपला कांदा जात नाही. उत्पादन जास्त आणि खरेदीदार कमी असल्याने कांद्याच्या दरावर परिणाम झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करत १२ रुपये ५० पैसे प्रतिकिलो दराने कांदा खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.’

राजू शेट्टींना टोला

माजी खासदार राजू शेट्टी यांनी अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येवरून राज्य सरकारवर केलेल्या टिकेला फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, आपल्याला आकडे पाहायला मिळतात. पंजाबची स्थिती काय आहे, इतर राज्यांची स्थिती आणि महाराष्ट्राची स्थिती काय आहे ? त्यामुळे महाराष्ट्राला अशा पद्धतीने बदनाम करणे, हे राजू शेट्टींना शोभत नाही.

अमली पदार्थ हे केवळ महाराष्ट्रासमोर नाही तर, संपूर्ण देशासमोरचे मोठे आव्हान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देशभरात अमली पदार्थविरोधी मोहीम सुरू करण्यात आली असून, महाराष्ट्र त्यात अग्रणी आहे. हा लढा काही काळ द्यावा लागेल. मात्र, त्यात आपलाच विजय होईल,’ असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

राज्यात वीजेचा तुटवडा नाही

‘राज्यात ऊर्जा संकट नाही. आवश्यकतेपेक्षा जास्त वीज उपलब्ध आहे. एखाद्या ठिकाणी ग्रीड फेल्युअर झाल्यानंतर काही तासांसाठी अडचण निर्माण होते. मात्र, संपूर्ण राज्यात वीजटंचाईची परिस्थिती नाही,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.