पुणे : ‘पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश (पीएमआर) परिसरात मेट्रो, विद्युत बस, इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड, बोगदे आणि नव्या विमानतळासह आधुनिक वाहतूक सुविधांचे जाळे उभारण्यात येत आहे. या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून २०३० पर्यंत पुणे महानगर प्रदेश देशातील महत्त्वाचे दळणवळण (मोबिलिटी) केंद्र म्हणून विकसित होईल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे लोकार्पण आणि मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, केंद्रीय मंत्री मनोहर लाल हे दूरदृश्य प्रणालीद्वारे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी चिंचवड महापौर रवी लांडगे, खासदार श्रीरंग बारणे या वेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘पुणे शहरात सुमारे १२० किलोमीटरचे मेट्रो मार्ग तयार झाले असून, काही मार्गांची कामे सुरू आहेत. देशातील मेट्रो विस्ताराचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला झाला आहे. राज्यातील १२ महापालिका क्षेत्रांत मेट्रो सुरू आहे किंवा मार्गिकांचे काम सुरू आहे.’
‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) केंद्र सरकारने पाच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या माध्यमातून पुणे आणि ‘पीएमआरडीए’ परिसरात आधुनिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याचे नियोजन आहे. पुणे परिसरात मेट्रो, विद्युत बस, इनर व आउटर रिंग रोड, ‘सीएमटीआर’, भूमिगत मार्ग आणि बोगद्यांचे जाळे विकसित होत आहे. त्यामुळे पुणे केवळ आयटी आणि उत्पादन क्षेत्राचेच नव्हे, तर फ्रंटियर टेक्नॉलॉजीचेही महत्त्वाचे केंद्र बनेल. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात पुण्याचे योगदान महत्त्वाचे ठरेल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘पुणे-मुंबई द्रुतगती मार्गामुळे पुण्याच्या विकासाला चालना मिळाली असून, मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होत आहे. पुण्याभोवती रिंग रोड विकसित करण्यात येत आहे. या सर्व प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल,’ असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
‘मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या ४२६ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, ही कामे प्रत्यक्षात पूर्ण होण्याकडे पालकमंत्री म्हणून बारकाईने लक्ष देणार आहे,’ अशी ग्वाही पवार यांनी दिली.
‘पुण्याच्या भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन मेट्रो विस्ताराबरोबरच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यातील नव्या बस, इनर आणि आउटर रिंग रोड, भूमिगत रस्त्यांचे जाळे आणि अन्य पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जात आहे,’ असे मोहोळ यांनी सांगितले.
‘पीएमआरडीए’चे आयुक्त अभिजीत चौधरी यांनी प्रास्ताविक केले. ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, ‘पीएमआरडीए’च्या अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजूलक्ष्मी आणि ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी हे अधिकारी उपस्थित होते.
