पुणे : ‘मी लहानपणी पुण्यातील काकांकडे यायचो. नागपूरला परत जाताना काकू नेहमी आम्हाला सहकारनगरमधील दुकानातून चितळेंचे बाकरवडीचे एक पाकिट घेऊन द्यायची. ते नागपूरला घेऊन जायची जबाबदारी आमची असायची पण…’ खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या तोंडून बाकरवडीबद्दलच्या प्रेमाची कहाणी सांगत होते अन् श्रोते त्याला रसभरीत दाद देत होते.
चितळे बंधू मिठाईवाले संस्थेच्या वतीने रांजे येथे उभारण्यात आलेल्या रांजे व्हिजन पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाद्यप्रेम सर्वश्रुत आहे. त्यांच्या या खाद्यप्रेमाची प्रचिती चितळे बंधू मिठाईवाले यांच्या रांजे व्हिजन पार्कच्या उद्घाटनावेळी आली. मुख्यमंत्र्यांनी बाकरवडीची लहानपणापासून असलेली आवड आणि पुणे ते नागपूर प्रवासातील किस्से यांची रंजक कहाणी गुरूवारी मांडली. त्याला श्रोत्यांनी जोरदार दाद दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘आम्ही लहानपणी पुण्यातील काकांकडे यायचो. आम्हाला काकू सहकारनगरमधील दुकानातून बाकरवाडीचे एक पाकीट घेऊन द्यायच्या. ते आम्ही नागपूरला घेऊन जायचो. त्यावेळी महाराष्ट्र एक्स्प्रेस नागपूरला पोहोचायला १२ ते १४ तास लागायचे. त्या प्रवासात बाकरवाडी संपून कधी जायची, हे कळायचेच नाही. हे समजल्यानंतर काकू आम्हाला नंतर बाकरवाडीची दोन पाकिटे देत असे. आम्ही लहानपणापासून बाकरवाडीचे फॅन आहोत. नागपूरमध्ये चितळे एक्स्प्रेस उघडले त्यावेळी ताज हॉटेल तिथे उघडल्याचा आम्हाला आनंद झाला होता.’
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात चितळे बंधू मिठाईवाले संस्थेचे भागीदार इंद्रनील चितळे यांनी भोर परिसरात खाद्यप्रक्रिया उद्योगासाठी विशेष आर्थिक क्षेत्राची गरज व्यक्त केली. प्रस्तावित पुरंदर विमानतळ नजीक असल्यामुळे या क्षेत्राला भविष्यात मोठा फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, शंकर मांडेकर, चितळे बंधू मिठाईवाले संस्थेचे भागीदार गोविंद चितळे, श्रीकृष्ण चितळे, केदार चितळे आदी उपस्थित होते.
१० किलोमीटरवर वेगळी खाद्यसंस्कृती
‘भारताच्या प्रत्येक भागात वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती पहायला मिळते. ही संस्कृती प्रत्येक १० किलोमीटरवर बदलते. या पारंपरिक पदार्थांना एखाद्या ब्रँडच्या रुपात जगात घेऊन जाण्याचे काम चितळे बंधूंनी केले. भविष्यात इतरही उद्योगांनी अशा प्रकाराची कामगिरी करावी. या परिसरात अनेक अन्नप्रक्रिया उद्योग आहेत. त्यामुळे भोरसह प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या परिसरात खाद्यप्रक्रिया उद्योगासाठी विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) उभारण्यासाठी उद्योगांशी सल्लामसलत केली जाईल. याचबरोबर निर्यातीभिमुख खाद्यप्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन दिले जाईल,’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
