पुणे : ‘विकसित भारताच्या निर्मितीसाठी तरुणांनी तिरंगा हाती घेतला आहे. युवा शक्तीच्या सामर्थ्यावर उद्याचा विकसित भारत घडणार असून समतेचा, प्रगतीचा आणि युवांच्या स्वप्नांना बळ देणारा विकसित महाराष्ट्रही घडणार आहे,’ असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तिरंगा हाती घेतल्यानंतर राज्यघटनेतील अधिकारांबरोबरच कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचे स्मरणही ठेवावे लागेल,’ असा सल्ला तरुणाईला दिला.

स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला मानवंदना देण्यासाठी तिरंगा गौरव समितीच्या वतीने मंगळवारी तिरंगा यात्रा काढण्यात आली. पोलीस मैदानापासून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप डेक्कन परिसरात झाला. त्यावेळी फडणवीस बोलत होते. महापौर मंजूषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, शत्रुघ्न काटे आदी उपस्थित होते.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशानुसार १५ ऑगस्टपर्यंत देशाच्या प्रत्येक शहरात, गावात राष्ट्रभक्ती प्रगट करण्यासाठी तिरंगा हाती घ्यावा आणि त्याची शान दाखवून द्यावी,’ असे आवाहनही फडणवीस यांनी केले ते म्हणाले,‘ तिरंगा हाती घेताना राज्य घटनेने दिलेल्या अधिकांबरोबरच कर्तव्यांची आणि जबाबदाऱ्यांची जाणीवही सर्वांनी विशेषत: तरुणाईने ठेवली पाहिजे. विकसित भारातच्या स्वप्नाबरोबरच येत्या २० वर्षांत सर्वसमावेशक, प्रगतीशील आणि तरुणांच्या आकांक्षांना बळ देणारा विकसित महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प आहे. पुणे विद्येची आणि संशोधनाचे, उद्योगाचे शहर आहे. त्यामुळे येथील तरुणांच्या बळावरच उद्याचा बलशाली भारत उभा राहील.’

यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

ललित महल चौकातून यात्रेला प्रारंभ झाला. फर्ग्युसन महाविद्यालय मार्गाने छत्रपती संभाजी महाराज चौकात यात्रेचा समारोप झाला. यावेळी दुतर्फा उभे राहून नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. ध्वनिवर्धकावरून वाजणारी देशभक्तीपर गीते, बँड पथकाकडून वाजवल्या जात असलेल्या देशभक्तीपर गीतांच्या सुरावटी अशा वातावरणामुळे यात्रेत उत्साह भरला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाती तिरंगा घेत भारतमातेचा जयजयकार करत यात्रेत सामील झाले.

जागोजागी यात्रेचे स्वागत करणाऱ्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. नागरिकांनी फुलांच्या पाकळ्या उधळत, घोषणा देत यात्रेचे स्वागत केले. विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, एनसीसी आणि एनएसएसचे छात्र तसेच काही माजी सैनिक यात्रेत सहभागी झाले होते. काही युवक स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेत आले होते.

काँग्रेसची टीका

‘कोणत्याही तिरंगा यात्रेला कोणाचा विरोध असणार नाही. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी दौरा केला असता, खड्डे विरहित पुणे बनवण्यासाठी प्रयत्न केला असता तर पुणेकरांनी त्यांना धन्यवाद दिले असते,’ अशी टीका काँग्रेसच्या शहराध्यक्ष दिप्ती चवधरी यांनी केली.

खड्डे, वाहतूक कोंडी यामुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांच्या मनस्तापात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्याकडे मुख्यमंत्री, भाजपचे केंद्रातील, राज्यातील मंत्री, पुण्यातील आमदार आणि पुणे महानगरपालिकेतील भाजप नगरसेवक हे का लक्ष देत नाहीत? ‘जेन-झी’च्या आंदोलनामुळे खडबडून जागे झालेल्या भाजपला आता तरी जनतेचे खरे प्रश्न सोडवण्यासाठी सुबुध्दी मिळेल,’ असे चवधरी यांनी सांगितले.

तिरंगा यात्रेमुळे वाहतूक कोंडी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या तिरंगा यात्रेमुळे शहरातील मध्यवर्ती भागासह डेक्कन परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले होते. अनेक रस्ते बंद करण्यात आल्यामुळे डेक्कन, भांडारकर रस्ता, कर्वे रस्ता, शास्त्री रस्त्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. शाळा-महाविद्यालये सुटण्याच्या वेळी हा कार्यक्रम झाल्याचा फटका अनेकांना बसला. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर वाहनांच्या लांब रांग लागल्याचे चित्र दिसून आले. त्याबाबत वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.