पुणे : ‘शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत ही महायुतीच्या सरकारनेच केलेली आहे. यापूर्वीच्या सरकारांनी केवळ तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. तेच आता तोंड उघडून बोलतायत. पण, ते काहीही बोलले तरी, आम्ही शेतकऱ्यांना मदत करू,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीवरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिले. ते म्हणाले,‘शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अग्रीम रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकार राज्य सरकारच्या पाठीशी आहे. ज्यांना मोठ्या-मोठ्या गाड्यांमध्ये फिरायची सवय आहे. मोठ्या-मोठ्या घरांमध्ये राहायची सवय आहे. त्यांना पाच हजार रुपयांचं महत्त्व कळू शकत नाही. त्याच महत्व शेतकऱ्यांना कळतं. शेतकऱ्यांना आम्ही मदत करणारच आहोत.’

‘केंद्र सरकारकडून मदतीची ग्वाही’

‘राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत, हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं आहे. त्यांची मदत आणि राज्याची मदत मिळून, शेतकऱ्यांना पुन्हा आपल्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न महायुती सरकार करेल,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. दरम्यान, दिवाळीत फटाक्यांनी ध्वनी आणि हवा प्रदूषण करू नये, असे आवाहन अभिनेत्री आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्या दिया मिर्झा यांनी मुंबई महापालिकेच्या समाजमाध्यमावरून केल्यावरून राजकारण तापले होते.

याकडे लक्ष वेधले असता,‘मुंबई महापालिकेने त्यांच्या ‘हँडल’वर काय ठेवायचे आणि काय नाही, हा त्यांचा अधिकार आहे. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले, असे काही वाटत नाही. दिया मिर्झा या प्रथितयश अभिनेत्री असतील; पण त्या काही देशातील खूप मोठ्या नेत्या नाहीत. त्याच्यामुळे हा विषय एवढा मोठा नाही,’ अशी प्रतिक्रियाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.

‘पुणे मेट्रोसाठी एकच तिकीट’

‘मेट्रोची ‘इंटिग्रेटेड तिकीटिंग सिस्टीम’ सुरू झाली आहे. ‘ओएनडीसी’च्या माध्यमातून ‘पीएमपीएल’चाही यात समावेश करण्यात आले आहे.
यात आणखी तांत्रिक सुधारणांची, ‘इंटिग्रेशन’ची गरज आहे. तेही लवकरच पूर्ण करू,’ असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.