पुणे : ‘मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या तब्येतीची सरकारला काळजी आहे. त्यांनी केलेल्या १३ पैकी १२ मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. मात्र, एका मागणीबाबत कायदेशीर अडचण आहेत. राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे खुले ठेवले आहेत. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात उत्सावावर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत येण्याचा निर्णय त्यांनी घेऊ नये,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे बुधवारी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी श्री कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, साने गुरुजी तरुण मंडळ, श्री साई मित्रमंडळ ट्रस्ट या गणपतींचे दर्शन घेतले आणि आरती केली. महापौर मंजूषा नागपुरे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांनी तेथेही गणरायाचे दर्शन घेतले. या वेळी फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘जरांगे यांच्या एका मागणीबाबत कायदेशीर अडचण असून, त्याची माहिती जरांगे यांना देण्यात आली आहे. मात्र, सरकारने चर्चेचे दरवाजे खुले ठवले आहेत. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. वैद्यकीय उपचार घ्यावेत. उपोषण नंतरही करता येईल. मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होतो. या परिस्थितीत मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा निर्णय जरांगे यांनी घेऊ नये. उत्सवावर ताण येईल, अशी कोणतीही भूमिका त्यांनी घेऊ नये. सरकार खुल्या मनाने सर्व गोष्टी मान्य करत आहे.’
‘सुरुवातीला चांगला पाऊस पडल्यानंतर मोठा खंड पडला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीतही सविस्तर चर्चा झाली. राज्य शासनाने प्राथमिक सर्वेक्षण सुरू केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना मदत केली जाईल,’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी आले असता, मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करून गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांचे ढोलवादन
श्री साई मित्रमंडळ ट्रस्टच्या परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत झाले. या वेळी त्यांनी ढोल वाजविणाऱ्या युवकाकडून टिपरी काठी घेऊन स्वतः ढोल वाजविण्याचा आनंद घेतला.
