भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं ७२ व्या वर्षी निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची आज प्राणज्योत मालवली. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे भावना व्यक्त केल्या. जमिनीशी नाळ असलेले राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपलं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Girish Bapat Death: भाजपा खासदार गिरीश बापट यांचं पुण्यात निधन; संध्याकाळी ७ वाजता होणार अंत्यसंस्कार

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने जमिनीशी नाळ असलेले आणि राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. विकास हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. पक्षनिष्ठ, पण पक्षापलीकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे”, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – “महाराष्ट्राने सच्चा, प्रामाणिक कार्यकर्ता गमावला”; गिरीश बापट यांच्या निधानानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना!

“देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर ते खासदार झाले. २०१४ ते २०१९ या सरकारच्या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती”, असेही ते म्हणाले.

“पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या उभारणी करणार्‍या नेत्यांमध्ये ते अग्रणी होते. म्हणूनच जनतेचे त्यांना भरभरुन प्रेम मिळाले”, असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा – “गिरीश बापट यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद!” शरद पवार यांनी व्यक्त केली खंत

“पुण्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारालाही त्यांनी लढवय्यासारखी झुंज दिली. यातून ते बाहेर येतील, अशी आशा होती. पण, आज ते आपल्याला सोडून गेले. आजारी असताना सुद्धा सातत्याने मतदारसंघावर त्यांचे लक्ष असायचे. त्यांचे निधन ही भारतीय जनता पक्षाची अपरिमित हानी आहे. एक उत्तम संसदपटू, उत्तम वक्ते आपल्यातून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे”, असंही ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis reaction after bjp mp girish bapat passed away spb
First published on: 29-03-2023 at 14:18 IST