देवेंद्र फडणवीसांनी ‘मुंगेरी लाल’ प्रमाणं सत्तेची स्वप्नं पाहू नयेत : अनिल देशमुख

श्रमिकांच्या प्रवासाचा केंद्रानं केला नाही खर्च

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख. (संग्रहित छायाचित्र)
सध्याच्या करोना परिस्थिती कोणीही राजकारण करू नये, सर्वानी मिळून काम करण्याची गरज आहे. पण यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारण करीत आहेत. त्यांनी ‘मुंगेरी लाल’ प्रमाणं सत्तेची स्वप्न पाहू नयेत, अशा शब्दांत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला, ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मंत्री विश्वजीत कदम हे देखील यावेळी उपस्थित होते.

फडणवीसांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला करोनाविरोधात लढ्यासाठी काही सूचना केल्या. तसेच अशा काळात कोणीही राजकारण करू, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आपल्या नेत्यांचं तरी त्यांनी अनुकरण करावं, असा सल्ला देशमुख यांनी फडणवीस यांना दिला.

देशमुख पुढे म्हणाले, करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कारागृहातून आत्तापर्यंत ९ हजार कैदी सोडण्यात आले आहेत. तसेच अजून ११ हजार कैदी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच आता नव्याने २४ जिल्ह्यात ३१ शाळांमध्ये तात्पुरते कारागृह तयार करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्रमिकांच्या प्रवासाचा केंद्रानं केला नाही खर्च

दरम्यान, आजपर्यंत १२ लाखांहून अधिक मजुरांना राज्य सरकारने त्यांच्या गावी पाठवले असल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये केंद्र सरकारने एकही श्रमिकावर प्रवासाचा खर्च केला नाही, सगळा खर्च हा राज्य सरकारने आणि मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीतून केला असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसाकडून लाचप्रकरणावर गृहमंत्र्यांनी टाळले उत्तर

पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमधील हवालदार विलास तोगे यांनी एक प्रकरणात अटक टाळण्यासाठी आरोपीकडून लाच मागितल्याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या हवालदाराच्या बदलीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी तीन महिन्यांपूर्वी पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे शिफारस केली होती. मात्र, या कर्मचाऱ्याच्या उद्योगाबाबत माहिती असतानाही तीन्ही मंत्र्यांच्या शिफारशीनंतरदेखील पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी या कर्मचाऱ्याची बदली करण्यास नकार दिल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रश्नाबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारले असता, या प्रकरणाची पोलीस आयुक्तांकडून माहिती घेऊन सांगतो, असे म्हणत त्यांनी पत्रकार परिषदेत आटोपती घेतली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Devendra fadnavis should not dream like mungeri lal says anil deshmukh aau 85 svk