पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर प्रचंड विकास कामे केली आहेत. या कामामुळेच विरोधकांचा वैताग, त्रागा, रागराग आहे. त्यांच्याकडे सांगायला काही काम नाही. त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. त्यामुळे निवडणुकीची चर्चा विकासावरुन वादावादी, प्रश्न-उत्तरात झाली पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न असे म्हणत निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो’, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाव घेता लगावला.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची शनिवारी आकुर्डीत जाहीर सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यावेळी उपस्थित होते. ‘महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे पिंपरी-चिंचवड शहर आहे. कष्टकऱ्यांची नगरी म्हणून शहर तयार झाले. भूमीपूत्रांसोबत महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले लोक कष्ट करत येथे वसले. त्यातून शहर तयार झाले’ असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘शहर बदलले पाहिजे त्यासाठी २०१४ नंतर प्रयत्न केले. शहराला आधुनिक चेहरा देण्याचा प्रयत्न केला. निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो. अनेक लोक काही-काही बोलत असतात. भाजपचे काम बोलत आहे. या कामामुळेच वैताग, त्रागा, रागराग आहे. हे समजून घ्यावे. ते रागवले म्हणून तुम्ही रागवू नका. शहरात आपण केलेली काम सांगितले तर, कोणालाही उत्तर देण्याची वेळ येणार नाही, असा सल्ला फडणवीस यांनी आमदार लांडगे यांना दिला.

‘मागीलवेळीेपक्षा यावेळी भाजपचे जास्त नगरसेवक निवडून येतील’, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. तत्कालीन सरकारच्या काळात शहरात ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुननिर्माण योजने’तून (जेएनएनयूआरएम) १३ हजार सदनिका बांधण्याचे काम १५ वर्षे रखडले होते. १५ वर्षात केवळ सहा हजार ७०० सदनिका उभारल्या. बांधकाम अतिशय निकृष्ट झाले. भाजपची सत्ता आल्यानंतर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी घरे बांधली. या दोन घरांच्या कामांची तुलना करावी. त्यातून तत्कालीन सत्ताधाऱ्यांचा कारभार काय होता आणि भाजपचा कसा होता, हे स्पष्ट होते’, असेही फडणवीस म्हणाले.

जागतिक दर्जाचे हब

‘पुणे जिल्हा उत्पादन, तंत्रज्ञानाचे हब आहे. आता जागतिक दर्जाचे हब केले जाणार आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांची जागतिक स्तरावरची २५ टक्के कार्यालये पुण्यात सुरु केली जाणार आहेत. भविष्यात पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या जास्त होणार आहे. त्यासाठी चांगले शहर विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे’ फडणवीस यांनी सांगितले.