पुणे : सध्या धर्मादाय संस्थांनाही इमारतीसाठी परवानगी देताना व्यावसायिक इमारतींप्रमाणे कर आकारला जातो. या करात काही प्रमाणात सूट देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.
लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’च्या कोनशिला अनावरण समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मंजूषा नागपुरे, फाउंडेशनचे अध्यक्ष पंडित हृदयनाथ मंगेशकर, विश्वस्त उषा मंगेशकर, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आनंद भोसले, आदिनाथ मंगेशकर, लता मंगेशकर फाउंडेशनचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘सध्या परवडणाऱ्या आरोग्यसेवेची सर्वाधिक गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला चांगले आणि परवडणारे उपचार मिळाले पाहिजेत. त्यासाठी अनेक धर्मादाय संस्था, रुग्णालये काम करतात. मात्र, वेगवेगळ्या पद्धतीच्या वित्तीय संकटांमुळे या वैद्यकीय सेवेचे व्यावसायिकीकरण झालेले दिसते. अशा प्रकारच्या व्यावसायिकीकरणाची संधी असतानाही केवळ सेवा म्हणून एखादा उपक्रम कसा केला पाहिजे, याचे पंडित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे उदाहरण आहे.’
‘मंगेशकर ट्रस्टच्या रुग्णालयाने सेवेचा सौदा न करता सेवाभाव कायम ठेवून लाखो रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचे कार्य केले. हेच कार्य नव्या रुग्णालय प्रकल्पाच्या माध्यमातून पुढे नेण्यात येईल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘लता-आशा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’कडे येजा करण्यासाठी पुरेशा रुंदीचा रस्ता आणि पाण्याची सुविधा पुणे महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापौर नागपुरे यांना केली. रुग्णालयात संगीतोपचाराची सुविधा निर्माण करण्याची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फाऊंडेशनला केली.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, बापू पठारे, हेमंत रासने आदी उपस्थित होते. मिलिंद कुलकर्णी यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे मनोगत सादर केले. वैशाली जोगळेकर, शंतनू गोखले, अमर ओक, पांडुरंग पवार यांनी सांगीतिक कार्यक्रम सादर केला.
‘सेवेत वाटा उचलणे गरजेचे’
‘शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी परवडणाऱ्या आणि सुलभ असण्याची गरज आहे. सर्व प्रकारचे उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध झाली, तर रुग्णावर होणारा खर्च कमी होतो. समाजात अनेक जण काहीही अपेक्षा न करता सेवा करत आहेत. त्यामुळे आपलेपणा टिकून राहतो. सेवा प्रकल्प सुरू रहाणे गरजेचे असते. त्यात प्रत्येकाने आपला वाटा उचलला पाहिजे,’ असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
