पुणे : मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले होते. यावरून राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पुन्हा नवीन राजकीय समीकरणे निर्माण होण्याची चर्चा सुरु आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केले असून अशा कार्यक्रमांच्या निमिताने भविष्यात पुन्हा एकत्र येण्याचे सूतोवाच केले आहे.

‘एका मोबिलिटी’च्या सहा उत्पादन प्रकल्पांचे ऑनलाइन उद्घाटन झाले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया, एका मोबिलिटीचे अध्यक्ष सुधीर मेहता व सुनंदा मेहता आदी उपस्थित होते.

यावेळी मुंबईतील कार्यक्रमाचा पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, त्या कार्यक्रमात हलकीफुलकी आणि हास्यविनोद फुलविणारी भाषणे होती. अशा कार्यक्रमातून महाराष्ट्राची एक चांगली संस्कृती समोर येते. राजकीयदृष्ट्या टीका करू शकत असलो, तरी अशा कार्यक्रमातून आम्ही एकत्र येतो, हीच संस्कृती महाराष्ट्राला अपेक्षित आहे. त्यातून वेगळा राजकीय अर्थ काढू नये. आमची बंद खोलीत बैठक वगैरे झाली नाही. कुठलीही राजकीय चर्चा त्या कार्यक्रमात झाली नाही. पुढील काळातही असे कार्यक्रम चांगले होतील आणि त्यानिमित्ताने एकत्र येऊ.’

पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नागपूर

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘विकसित भारताकडे वाटचाल करताना स्वच्छ आणि हरित गतिशीलतेला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण अधिक असून, आपण पर्यावरणपूरक इंधन पर्यायांकडे वळायला हवे. भारतीय अर्थव्यवस्थेवर सातत्याने जीवाश्म इंधन आयातीचा दबाव आहे. हा दबाव कमी झाल्यास आपल्या अर्थव्यवस्थेची आगेकूच कोणीही रोखू शकत नाही. महाराष्ट्र हा आता विद्युत वाहनांचे उत्पादन केंद्र बनू लागला आहे. यात आधीपासून पुणे आघाडीवर असून, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरही आता वेगाने प्रगती करीत आहेत.’

५० हजार विद्युत बसची गरज

‘सरकारला मुंबई आणि एसटी महामंडळासाठी विद्युत बस खरेदी करावयाच्या आहेत. मात्र, हा पुरवठा कमी असल्याचे आव्हान समोर आहे. आगामी काळात मुंबईसाठी १० हजार विद्युत बस आणि एसटी महामंडळासाठी ३० हजार विद्युत बसची आवश्यकता आहे. पुण्यात पीएमपीमध्ये २०१५-१६ मध्ये विद्युत बस दाखल झाल्या. त्या वेळी एक रुपयाही तिकीट न वाढविता नागरिकांना वातानुकूलित बसमधून प्रवास शक्य झाला. सरकारकडून प्रत्येक मोठ्या शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत विद्युत बसला प्राधान्य देण्यात येत आहे,’ असे फडणवीस यांना सांगितले.