बनवाबनवी आणि पळवा पळवी करून राज्यात भाजपा सत्तेत
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू असून महाविकास आघाडी चे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत धनंजय मुंडे यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग परराज्यात घेऊन जाण्याचे पाप भाजपा करत आहे. उद्या पंढरपूरातील विठ्ठल गुजरातला घेऊन जातील आणि म्हणतील विठ्ठल गेला आहे आम्ही तुम्हाला तिरुपती आणुन देतो. अशा प्रकारचे राज्यातील सरकार आहे असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते पिंपरी- चिंचवड शहरातील राहटणी येथे प्रचार सभेत बोलत होते. धनंजय मुंडे म्हणाले की, खऱ्या अर्थाने ही पोटनिवडणूक लागायला नको होती.
हेही वाचा >>> पुणे : कोणत्याही मालमत्तेवर, संपत्तीवर दावा नाही ; एकनाथ शिंदे
दिवंगत लक्ष्मण जगताप हे चांगले मित्र होते. ते एवढ्या लवकर निघून जातील असे वाटले नव्हते. लक्ष्मण जगताप यांच्या डोक्यावर शरद पवार आणि अजित पवार यांचा हात होता. २०१४ नंतर त्यांनी वेगळी वाट धरली ते भाजपात गेले. पिंपरी- चिंचवडमधील विकासाची भाजपाने वाट लावली. कुत्र्याच्या नसबंदीत त्यांनी भ्रष्ट्राचार केला. पुढे ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी सुरत लुटले होते. परंतु, आत्ताचे राज्यकर्ते हे सिंहासन वाचवण्यासाठी लोटांगण घालत आहेत. राज्यातील सरकार पळवा पळवी आणि बनवाबनवी करून आले आहे. महाराष्ट्रातील देव पळवून नेहण्याचे पाप केले जात आहे. १२ ज्योतिर्लिंगा पैकी एक ज्योतिर्लिंग हे आसाम चे असल्याचा दावा केला जातो आहे. उद्या हे पंढरपुरातील विठ्ठल गुजरातला घेऊन जातील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विचारले तर ते म्हणतील विठ्ठल गेला आहे आम्ही तुम्हाला तिरुपती आणून देऊ. अशा प्रकारचे सरकार असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.