रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाउंडेशनच्या वतीने आळंदी येथे १९०६ सालच्या फ्रुटवाले धर्मशाळेच्या जागेवर सर्व सोयींनीयुक्त असे नवे भक्तनिवास व वारकरी सांप्रदाय प्रशिक्षण केंद्र या संकुलांची उभारणी करण्यात येत असून, त्याचे उद्घाटन आणि हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (१ मार्च) होणार आहे.
फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा धारिवाल यांनी ही माहिती दिली. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष रसिकलाल धारिवाल, फ्रुटवाले धर्मशाळेचे अध्यक्ष भगवान थोरात, विश्वस्त विजयराव ढोबळे आदी उपस्थित होते. भक्तनिवास आणि प्रशिक्षण केंदाचे रविवारी (१ मार्च) सकाळी ९.३० वाजता होणार आहे. या वेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह खासदार, आमदार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
धारिवाल म्हणाल्या, की भक्तनिवास आणि वारकरी प्रशिक्षण केंद्र सर्व सोयींनीयुक्त आहे. या वास्तूंची देखभाल फुट्रवाले धर्मशाळेकडून केली जाणार आहे. या संकुलात पाच हजार आसन क्षमता असलेला १३ हजार चौरस फुटांचा प्रशस्त सभामंडप आहे. दोन हजार चौरस फुटांचे सत्संग सभागृह, ४२ खोल्यांचे भक्तनिवास, तीन हजार आसन क्षमतेसह ९ हजार चौरस फुटांचे प्रशस्त भोजनगृह यांचाही त्यात समावेश आहे.