पिंपरी : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी सोमवारी ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बॉलीवूडचे ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे मावळ तालुक्यातील लोणावळ्याजवळील औंढे गावच्या ग्रामस्थांशी अनोखे नाते होते. या गावात त्यांचे शंभर एकर क्षेत्रफळावर मोठे फार्म हाऊस आहे. १९८५ पासून औंढे गाव मावळ तालुक्याच्या नकाशावर मोठ्या प्रमाणावर चर्चेला आले. त्याचे कारण म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी औंढे गावातील शंभर एकर शेतजमीन विकत घेतली. १२ जून १९८५ ला हा व्यवहार झाला होता. लोणावळा बाजारपेठेपासून तीन किलोमीटर अंतरावर तर महामार्गाला चिटकून औंढे गाव असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विजय जगताप यांनी सांगितले.
धर्मेंद्र यांच्या फार्म हाऊसवर माळी काम करणारे राजू वाघमारे हे आठवणींना उजाळा देताना म्हणाले, ‘धर्मेंद्र यांचे व्यक्तीमत्व दिलदार होते. गावाच्या उरसाला मोठी मदत द्यायचे. शिवजयंती, आंबेडकर जयंतीला सर्वाधिक वर्गणी त्यांची असायची. येणाऱ्या प्रत्येकाला मदत करायचे. कोणाला नाराज करत नव्हते. शंभर एकर पैकी ६५ एकर क्षेत्रफळावर फळे, कोबी, टोमॅटो, वांगी भाजीपाला, पिकवला जात होता. यातून मिळणारे उत्पन्न ते कर्मचाऱ्यांना वाटत असे. बदके, म्हशी, जरसी गायी असून येथील प्रत्येक कर्मचाऱ्यांना गायींचे दूध पिण्यासाठी देत होते. तूप सर्वांना वाटायचे’.
‘औंढे गावाचा रस्ता कच्चा होता. गावाच्या रस्त्यासाठी त्यांनी पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांना फोन केला होता. जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून रस्ता करून दिला. गावातील कोणाचे भांडण झाले, तर दोन्ही बाजूच्या लोकांना बोलावून घेत होते. समोरा समोर बसवून भांडण सोडवायाचे, गावातील वातावरण चांगले रहावे यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले. गावाशी त्यांची नाळ जोडली गेली होती’, असे वाघमारे यांनी सांगितले.
गणेशोत्सवानंतर परतलेच नाहीत
धर्मेंद्र हे औंढे येथील फार्म हाऊसवर २० वर्षे राहिले. २००४ ला ते येथे कायमस्वरूपी वास्तव्यासाठी आले. त्यापूर्वी अधूनमधून येत होते. त्यांनी येथे सेंद्रिय पद्धतीने शेती केली. त्यांना भाजीपाला, दूध वाटण्यात आनंद वाटायचा, येथे पिकवलेल्या मालातून मिळणारे उत्पन्न त्यांनी कधीही घेतले नाही. कामगार उत्पन्नाचे पैसे देण्यासाठी गेल्यानंतर मी एक चित्रपट केला, तर मला एक कोटी रुपयांहून अधिक पैसे मिळतात. हे पैसे तुम्ही वाटून घ्या असे आम्हाला सांगायचे. गणेशोत्सवापर्यंत ते येथे होते. प्रकृती खालावल्याने गणेशोत्सवानंतर ते मुंबईला परत गेले. त्यानंतर आलेच नाहीत. आणि आज त्यांच्या निधनाची बातमी आली. त्यांच्या जाण्याने औंढे गावचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी असून मी १८ वर्षे त्यांच्या फार्म हाऊसवर काम केल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
