पुणे : कौटुंबिक वादातून सासऱ्याने सुनेचे भिंतीवर डोके आपटून खून केल्याची धक्कादायक घटना धायरीतील रायकर मळा परिसरात घडली. सुनेचा खून करुन सासरा पसार झाला आहे. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

स्वाती तेजस चौधरी (वय ३१) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती चौधरी गृहिणी आहेत. त्यांचे पती शिवाजीनगर न्यायालयात लिपिक आहेत. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास तेजस चौधरी हे शिवाजीनगर न्यायालयात कामावर गेले. त्या वेळी स्वाती, त्यांचा सहा महिन्यांचा मुलगा आणि सासरे घरात होते.

स्वाती आणि सासऱ्यांमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास वाद झाला. त्यानंतर स्वाती या कपडे धुण्यासाठी गेल्या. सासरे प्रसाधनगृहात गेले. कपडे धुणााऱ्या स्वाती यांचे डोके त्यांनी प्रसाधनगृहातील भिंतीवर आपटले. कपडे घासण्यासाठी वापरला जाणारा दगड स्वाती यांच्या डोक्यात घातला. स्वाती गंभीर जखमी झाल्या त्या प्रसाधनृहात रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.

गंभीर जखमी अवस्थेतील सूनेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता सासऱ्याने घराला बाहेरून कुलूप लावले. दरम्यान, दुपारी दीडच्या सुमारास स्वाती यांचा सहा महिन्याचे मूल रडू लागले. त्याच्या रडण्याचा आवाज शेजाऱ्यांनी ऐकला. शेजारी चौधरी यांच्या घराजवळ गेले. तेव्हा घराला बाहेरून कुलूप लावण्यात आल्याचे दिसून आले.

स्वाती यांच्या मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. नांदेड सिटी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. कुलूप तोडण्यात आल्यानंतर प्रसाधनगृहात रक्ताच्या थारोळ्यात स्वाती पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

पसार झालेल्या सासऱ्याचा शोध घेण्यात येत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.