पुणे : सदनिकेच्या दरवाजाच्या परिसरातील पादत्राणे ठेवण्याची जाळी (शू रॅक), कुंडी, तसेच दरवाज्याजवळ चावी ठेवणे महागात पडले. सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात एका महिलेने सदनिकेच्या बाहेर ठेवलेल्या पादत्राणांच्या जाळीत चावी ठेवली होती. चोरट्यांनी चावी चोरून सदनिकेचे कुलूप उघडले. कपाटातून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून चोरटे पसार झाले. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका महिलेने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या धायरीतील रायकर मळा परिसरात असलेल्या श्री हाईट्स इमारतीत राहायला आहेत. १६ मार्च रोजी त्या सकाळी दहाच्या सुमारास सदनिका बंद करुन कामाला गेल्या. त्यांनी सदनिकेची चावी पादत्राणांच्या जाळीत ठेवली होती. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्या कामावरुन घरी आल्या. तेव्हा सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी सदनिकेची चावी चोरल्यानंतर शयनगृहातील कपाट उचकटले. कपाटातील दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवून चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव तपास करत आहेत.

वर्षभरापूर्वी सॅलिसबरी पार्क परिसरात अशाच प्रकारची एक घटना घडली होती. चोरट्यांनी सदनिकेतून ३० लाखांचे दागिने लांबविले होते. नागरिकांनी पादत्राणांची जाळी, तसेच सदनिकेच्या दरवाज्याच्या परिसरात चावी ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सोलापूर रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अकबर चाँद शेख (वय ३९, रा. होरेब नगर, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा रेहान (वय १८) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अकबर शेख हे मंगळवारी (१७ मार्च) मध्यरात्री अडीचच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्याने निघाले होते. त्या वेळी लोणी काळभोर परिसरातील शांताई हाॅस्पिटलसमोर भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार शेख हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक बराटे तपास करत आहेत.