अविनाश भोसले: अभिनेत्री ॲंजेलिना जोलीचा पाहुणचार करणारा पुणेकर सीबीआयच्या ताब्यात; त्यांची आर्थिक भरभराट पाहून व्हाल थक्क

एक साधा रिक्षाचालक ते स्वमालकीची तीन हेलिकॅाप्टर खरेदी करण्यापर्यंतचा तसेच भाडेकराराने घेतलेली छोटी खोली ते बाणेर येथील व्हाइट हाऊस हा अलिशान बंगला हा अविनाश भोसले यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

avinash bhosale angelina jolie
भोसले यांना गुरुवारी सीबीआयने अटक केली (फोटो प्रातिनिधिक, सौजन्य फेसबुक आणि रॉयटर्सवरुन साभार)

पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने( सीबीआय) गुरुवारी अटक केली. येस बँक-डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली.  गैरव्यवहारातील रक्कम इतरत्र वळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे प्रकरण २०१८ मधील असून, त्यावर्षी एप्रिल ते जून या कालावधीत हजारो कोटी रुपये इतरत्र व्यवहारात आणण्यात आले. त्यासाठी विविध बँक खात्यांचा वापर करण्यात आला होता. त्यातील काही रक्कम अविनाश भोसले यांनी इतरत्र वळवल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी सीबीआयने १ मे रोजी पुणे आणि मुंबईत शोध मोहीमही राबवली होती.

 येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएलमध्ये तीन हजार ७०० कोटी रुपये कर्ज स्वरूपात दिले होते. यात राणा यांना ६०० कोटी रुपयांची मिळाल्याचा आरोप आहे. त्यानंतर डीएचएफएलने भोसले यांच्याशी संबंधित कंपनीत पैसे वळते केले होते. त्याच्यासोबत बांधकाम व्यावसायिक सुनील छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुपकडेही हे पेसै गेल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले होते. सीबीआयने केलेल्या तपासणीत गैरव्यवहारातील रक्कम इतरत्र वळती करण्यात भोसले यांचा प्राथमिकदृष्टय़ा सहभाग आढळल्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अविनाश भोसले पुण्यातील प्रसिद्ध व्यवसायिक आहेत.

सुरूवातीच्या काळात रिक्षा चालक म्हणून काम करणारे भोसले पुण्यातील मोठे बांधकाम व्यवसायिक झाले. अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. एक साधा रिक्षाचालक ते स्वमालकीची तीन हेलिकॅाप्टर खरेदी करण्यापर्यंतचा तसेच भाडेकराराने घेतलेली छोटी खोली ते बाणेर येथील व्हाइट हाऊस हा अलिशान बंगला हा अविनाश भोसले यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

बांधकाम व्यवासायाबरोबरच राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधांमुळेही कायम चर्चेत राहिलेले अविनाश भोसले अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातून नोकरीच्या शोधात पुण्यात आले. पुण्यात नोकरी न मिळाल्याने रिक्षा चालविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. रास्ता पेठ परिसरात त्यांनी भाड्याने घर घेतले आणि रिक्षा चालविण्याचा व्यवसाय सुरू केला. रिक्षा व्यवसायात थोडा जम बसल्यानंतर रिक्षा भाड्याने चालविण्यास देण्यास अविनाश भोसले यांनी सुरवात केली. त्यातून बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांचे संबंध आले. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारी करणाऱ्या काही व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतर रस्ते करण्याची लहान-मोठी कंत्राटे त्यांना मिळाली. पुढे नातेवाईकांच्या माध्यमातून त्यांनी जास्त मोठी कंत्राटे घेण्यास सुरुवात केली. मात्र सेना-भाजप युतीच्या सत्ताकाळातच त्यांची खरी भरभराट झाली.

बाणेर येथील त्यांचा अलिशान व्हॅाईट हाऊस हा बंगला आणि तीन हेलीकाप्टर हा चर्चेचा विषय ठरला. हॅालिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री ॲंजेलिना जोली हिचे त्या बंगल्यातील वास्तव्य चर्चेचा विषय झाले होते. शहरात येणारे अनेक बडे राजकीय नेते त्यांचे हेलिकॅाप्टर आणि हेलिपॅडचा वापर करतात, ही गोष्टही लपून राहिली नाही.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dhfl yes bank case cbi arrests businessman avinash bhosale but who is he pune print news scsg

Next Story
मुलीने ९९.९ टक्के मार्क मिळाल्याचं सांगताच अजित पवारांनी जोडले हात; म्हणाले “आमचे दोन वर्षांचे जोडूनही…”, उपस्थितांमध्ये हशा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी