पुणे: भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाईल, अशी चर्चा होत असताना प्रदेश भाजपकडून माजी सभागृहनेते धीरज घाटे यांची फेरनिवड करण्यात आली. घाटे यांना शहराध्यक्षपदी काम करण्यासाठी काहीसा कमी कालावधी मिळाल्याने त्यांची फेरनिवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पुणे उत्तरच्या (मावळ) जिल्हाध्यक्षपदी भाजपचे नेते, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली होती.
शहराध्यक्षपदासाठी घाटे यांच्याबरोबरच माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि गणेश बीडकर, माजी नगरसेविका वर्षा तापकीर स्पर्धेत होते. शहराध्यक्षपदाची निवड करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांची पर्यवेक्षक म्हणून तर, शेखर इनामदार यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या दोघांनीही गेल्या आठवड्यात पदाधिकाऱ्यांचा कौल जाणून घेतला होता. त्या वेळी शहराध्यक्षपदी काम करण्यासाठी घाटे यांना कमी कालावधी मिळाल्याने त्यांना पुन्हा संधी द्यावी, अशी भूमिका काही पदाधिकाऱ्यांनी मांडली होती. मात्र, घाटे, भिमाले आणि बीडकर यांची नावे अंतिम करून ती पक्षाच्या सुकाणू समितीकडे (कोअर कमिटी) पाठविण्यात आली होती. त्यानुसार घाटे यांच्या नावाची घोषणा मंगळवारी करण्यात आली.
घाटे यांची जुलै २०२३ मध्ये शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाली. तसेच सदस्य नोंदणी अभियानही घाटे यांनी सक्रियपणे राबविले होते. घाटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून, महापालिकेत त्यांनी सभागृहनेते म्हणूनही कामकाज पाहिले आहे.
दरम्यान, पुणे उत्तरच्या (मावळ) जिल्हाध्यक्षपदी भाजपचे नेते, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी कंद यांची ओळख आहे. ते विधानसभा निवडणूक लढविण्यासाठीही इच्छुक होते. कंद यांची निवड करून भाजपने ग्रामीण भागात नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत विजय, विधानसभेत सहा आमदार निवडून देत आणि शहरात साडेपाच लाख सदस्य नोंदणी करत भाजपने आगामी महापालिका निवडणुकीसाठी विजयाचा दावा भक्कम केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीनंतर महापालिकेत भाजपचा महापौर असेल. पक्षाने पुन्हा संधी देऊन दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यात येईल. – धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप