कुत्र्या-मांजरांना मधुमेह..ही गोष्ट ऐकायला नवी वाटत असली तरी आता बदललेल्या जीवनशैलीबरोबर येणारे आजार पाळीव प्राण्यांमध्येही वाढत्या प्रमाणात दिसू लागले आहेत. सध्या कुत्र्या-मांजरांच्या मालकांसाठी या प्राण्यांना होणारा मधुमेह ही चिंतेची बाब ठरली असून रविवारी पुण्यात झालेल्या पशुवैद्यक तज्ज्ञांच्या चर्चासत्रात हा विषय विशेष चर्चेचा ठरला.
माणसांप्रमाणेच कुत्र्यांमध्येही व्यायामाचा अभाव, खाण्याच्या चुकीच्या पद्धती मधुमेहासाठी कारणीभूत ठरत असल्याचे पशुतज्ज्ञ डॉ. विनय गोऱ्हे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘अंत:स्त्राव ग्रंथींच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे मधुमेह होतो. कुत्र्यांमध्ये ‘टाईप १’  मधुमेह अधिक आढळतो. मधुमेह झालेल्या कुत्र्यांपैकी ५० टक्क्य़ांपैक्षा अधिक कुत्र्यांना टाईप १ मधुमेहच असतो. यात शरीरात पुरेसे इन्शुलिन बनत नाही. मधुमेही मांजरींमध्ये ४० टक्के मांजरींना ‘टाईप २’ मधुमेह असतो. या मधुमेहात शरीर इन्शुलिन तयार करते पण त्याचा साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोग होत नाही. मांजरांमधील मधुमेह प्रामुख्याने लठ्ठपणा आणि पोटाच्या भोवती जमलेली चरबी यामुळे होतो. मांजरांच्या अन्नात पिष्टमय पदार्थ आणि स्निग्ध पदार्थ अधिक असल्यामुळे लठ्ठपणा वाढतो.’’
‘कुत्र्यांना फिरवून आणणे आता कमी झाल्यामुळे त्यांच्या शरीराला व्यायाम होत नाही, तसेच कुत्र्यांच्या काही जाती मुळातच मधुमेहाला बळी पडू शकणाऱ्या असतात,’ असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
‘मार्स इंटरनॅशनल’च्या ‘पेडिग्री’ या पशुखाद्याच्या ब्रँडतर्फे आयोजित केलेल्या या चर्चासत्रात देशातील सुमारे पन्नास पशुवैद्यक तज्ज्ञ सहभागी झाले होते. पाळीव प्राण्यांना होणारे आजारांचे वेळेवर निदान न झाल्यास त्यातील गुंतागुंत वाढू शकते, असा मुद्दा कंपनीचे पाळीव प्राणी तज्ज्ञ डॉ. के. जी. उमेश यांनी मांडला. पाळीव प्राण्यांच्या अंत:स्त्राव ग्रंथींमध्ये झालेल्या बिघाडाकडे दुर्लक्ष न करता या प्राण्यांमध्ये दिसणारी लक्षणे त्या दृष्टीने तपासली जायला हवीत, असे मत पशुवैद्यक तज्ज्ञांनी मांडले.
कुत्र्याचा वयोगट    मधुमेहाचा धोका
३ ते ९ वर्षे        ०.३ टक्के
१० वर्षांच्या वर    १ टक्का
– म्हणजेच दहा वर्षांवरील दर १०० कुत्र्यांपैकी एका कुत्र्याला मधुमेहाचा धोका असतो.
कुत्र्याला किंवा मांजराला असलेला मधुमेहाचा धोका कसा ओळखावा?
कुत्र्यांमधील मधुमेहाची लक्षणे- खूप पाणी पिणे, खूप लघवी करणे, खूप खाऊनही वजन कमी होणे.
मांजरांमधील लक्षणे- लठ्ठपणा, सुस्तपणा, अंगात ताकद कमी असणे
अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास पशुवैद्यक तज्ज्ञांची मदत घ्यावी, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. ‘मधुमेह झालेल्या पाळीव प्राण्यांचे आयुष्य वैद्यकीय उपचारांद्वारे वाढवता येते. मधुमेही माणसांना ज्याप्रमाणे इन्शुलिनचे इंजेक्शन देतात तसेच इंजेक्शन कुत्र्या-मांजरांनाही देता येते,’ असेही ते म्हणाले.