प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन

पुणे : करोना महासाथीच्या काळात मधुमेह ही सहव्याधी असलेल्या रुग्णांना महासाथीचा धोका सर्वाधिक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात येत होते. मात्र, करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये दिसणारा मधुमेह हे वैद्यकीय तज्ज्ञांच्या चिंतेचे कारण ठरत आहे.

करोनावर उपचारांदरम्यान देण्यात आलेले स्टिरॉइड्स मधुमेहाला निमंत्रण देत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे.  करोनामधून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढत असल्याने अशा रुग्णांनी दर सहा महिन्यांनी मधुमेहाची चाचणी करून घेणे योग्य ठरेल, असा सल्लाही तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत. ज्यांना कुटुंबातील व्यक्तींकडून मधुमेहाची पाश्र्वभूमी आहे त्यांना तसेच करोना विषाणू संसर्गाचा थेट परिणाम स्वार्दुंपडावर झाल्याने इन्सुलिन स्रावण्याची प्रक्रिया मंदावत असल्याचे दिसून येत आहे.

जनरल फिजिशियन डॉ. संजय नगरकर म्हणाले, करोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांमध्ये मधुमेहाचे निदान होत आहे. बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या मधुमेही रुग्णांची संख्याही वाढली आहे. करोनातून बरे झालेल्या रुग्णांना जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे, अंधुक दिसणे, जखम बरी होण्याचा वेग मंदावणे, थकवा यांसारखी लक्षणे दिसत आहेत. काही रुग्णांमध्ये करोना होण्यापूर्वीच मधुमेह असणे मात्र त्याचे निदान झालेले नसणे शक्य आहे. मात्र, स्टिरॉइड आणि इन्सुलिनवर अवलंबून असलेल्या उपचारांमुळे मधुमेहाला चालना मिळते. करोना संसर्गाचा परिणाम रक्तातील साखरेच्या पातळीवर होतो आणि कोविडमुक्त झाल्यानंतर मधुमेहाला आमंत्रण मिळते.

पॅथॉलॉजिस्ट डॉ. कीर्ती कोटला म्हणाले, जीवनशैलीतील बदल तसेच करोना काळातील उपचारांमुळे करोनानंतर मधुमेहाची लागण झालेल्या रुग्णसंख्येत मागील वर्षी आलेल्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेनंतर लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आपल्या शरीरातील मधुमेहाचा शिरकाव रोखण्यासाठी आहाराच्या सवयींमध्ये बदल गरजेचा आहे. त्याबरोबरच नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप, वेळच्या वेळी आवश्यक चाचण्या करणे, आहारातील जंकफूडचा समावेश टाळणे महत्त्वाचे आहे.

खबरदारी हाच उपाय

मधुमेहतज्ज्ञ डॉ. उदय फडके म्हणाले, ज्यांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त आहे, ज्यांना मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास आहे, त्याचबरोबर स्थूल आणि लठ्ठ व्यक्ती, रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉलचे रुग्ण या सर्वांनी लक्षणे नसली तरी नियमित रक्ताच्या चाचण्या करून घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने रिकाम्या पोटी तसेच जेवल्यानंतरच्या चाचण्या, एचबीएवनसी या चाचण्या करून घ्याव्यात. सध्या अनेक तरुण-किशोरवयीन मुला-मुलींमध्ये स्थूलपणा पाहायला मिळतो. रक्तातील साखरेच्या प्रमाणाची पातळी चिंताजनक असते. त्यामुळे खबरदारी हाच उपाय आहे, याचे भान ठेवावे.