‘स्त्रियांकडे बघण्याची नजर स्वच्छ असायला हवी हा संदेश ‘स्वच्छ भारत अभियाना’सारखा घराघरात पोहोचायला हवा. स्त्री माणूस आहे हा दृष्टिकोन ठेवून तिला मिळणारी वागणूक आणि तिच्याबद्दलचे विचार स्वच्छ व्हायला हवेत,’ असे मत अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पत्रकारांनी मराठी तारकांशी संवाद साधला. अभिनेत्री भार्गवी चिरमुले, किशोरी गोडबोले, संस्कृती बालगुडे, प्राची पिसाट, आदिती घोलप, ‘मराठी तारका’ या नृत्याविष्कार कार्यक्रमाचे दिग्दर्शक महेश टिळेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र बडदे आदि या वेळी उपस्थित होते.
भार्गवी म्हणाली, ‘‘स्त्रियांचे सशक्तीकरण प्रत्येक घरात आणि मालिकांमध्येही होण्याची गरज आहे. प्रेक्षकांनाही मालिकेतील मध्यवर्ती स्त्री भूमिकेने रडायलाच हवे असते. ‘वहिनीसाहेब’ या मालिकेत भूमिका करताना मी हा अनुभव घेतला.’’ दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेवरील माहितीपटाबद्दल बोलताना भार्गवी म्हणाली, ‘‘सोशल माध्यमांचे वर्तन अनेकदा बेजबाबदार वाटते. हा माहितीपट बघण्यासाठी आपण खरोखरच प्रगल्भ झालो आहोत का? किती जणांनी त्याची दाहकता समजून घेतली आणि किती जणांनी केवळ ‘लाईक’ केले?’’
किशोरी म्हणाली, ‘‘ माझी ‘अधुरी एक कहाणी’ ही मालिका खूप गाजली. जवळपास पावणेपाच वर्षे मी त्या मालिकेत रडत होते! माझी भूमिका डॉक्टरची आहे, तिला सशक्त दाखवायला हवे असे वाटायचे. पण मालिकेचा ‘टीआरपी’ सुसाट होता.’’
‘‘अभिनय करताना संवाद खटकले किंवा ते अश्लीलतेकडे झुकणारे वाटले तर अशी वाक्ये बोलायची नाही हे मी पाळते. पण प्रत्येक ठिकाणी कलाकाराचे मत मान्य केले जात नाही,’’ असेही तिने सांगितले.
‘आमच्या मुलींना आम्ही मुलासारखेच वाढवले,’ हा शब्दप्रयोग आपल्याला खटकतो, असे स्मिता शेवाळे हिने सांगितले. ती म्हणाली,‘‘महिला म्हणून आम्ही वेगळ्या नाही, आम्ही मुळातच सक्षम आहोत, ही भावना महिलांमध्ये रुजायला हवी. चित्रपटसृष्टीतील स्पर्धेची मला भीती वाटत नाही. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ‘आयटम साँग’ करायला हवे असेही वाटत नाही.’’