‘उद्योगनगरी’ असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संस्था व संघटनांनी विविध उपक्रम राबवून महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन मोठय़ा उत्साहात साजरा केला.
श्रमिक एकता महासंघाच्या वतीने कुशल कामगारांना खासदार अमर साबळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले, कार्याध्यक्ष दिलीप पवार, सरचिटणीस केशव घोळवे, भाजपचे माजी सरचिटणीस माउली थोरात उपस्थित होते. या वेळी सहायक कामगार आयुक्त संतोष भोसले यांच्यासह निशा पिसे, दत्तात्रय येळवंडे, अरुण त्रिपाठी, अशोक देसाई यांचा गौरव करण्यात आला. यावेळी साबळे म्हणाले, देशातील कामगार हा शोषित, पीडित आणि उपेक्षित आहे. कामगारांमध्ये संघटितपणाचा अभाव आहे, हे त्यामागचे कारण आहे.
पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आकुर्डी ते पिंपरी चौकापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली, त्यामध्ये मोठय़ा संख्येने कामगार सहभागी झाले होते. त्यानंतर झालेल्या सभेत कैलास कदम, अजित अभ्यंकर, अॅड. म. वि. अकोलकर, अनुराधा आठवले, रेखा थिटे, शरद गोडसे, चंद्रकांत तिवारी, भरत शिंदे, विजयसिंग कदम, सुनील पाटसकर आदी पदाधिकारी सहभागी होते. या वेळी बोलताना कदम म्हणाले, कामगार क्षेत्रात खासगीकरण व कंत्राटीकरण करण्याच्या उद्देशातून केंद्र व राज्य सरकार कामगार कायद्यात बदल करू इच्छित आहेत. सरकारने कामगार हिताचे कायदे करावेत, ते करताना सर्वाना विश्वासात घ्यावे.
अभ्यंकर म्हणाले, उद्योगातील ७५ टक्के कामगार कंत्राटी पद्धतीमध्ये ढकलला गेला असून सरकार सर्व कामगारांचे संरक्षण काढून घेत आहे.

.