scorecardresearch

आणखी काही दिवस रस्ते खोदाईचा त्रास

मध्यवर्ती पेठांच्या भागात मुख्य बाजारपेठ असल्याने, तेथे दररोज मोठय़ा प्रमाणात रहदारी असते.

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात विविध प्रकारच्या सेवा वाहिन्या टाकण्याची कामे अद्यापही अपूर्ण असल्याने पुढील काही दिवस रस्ते खोदाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, वीस जानेवारीपर्यंत कामांसह रस्ते दुरुस्ती पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदत संपुष्टात आल्याने रस्ते पूर्ववत करण्यासाठी आणखी तीन आठवडय़ांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस वाहनचालकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

महापालिकेच्या पथ विभाग, मलनिस्सारण, पाणीपुरवठा विभागाकडून विविध कामे करण्यासाठी शहरातील मध्यवर्ती भागातील रस्त्यांची मोठय़ा प्रमाणावर खोदाई करण्यात आली होती. बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता तसेच कुमठेकर रस्त्याची मोठय़ा प्रमाणावर खोदाई झाल्याचे तीव्र पडसाद उमटले होते. वाहनचालकांना होत असलेल्या त्रासाबाबत आंदोलनही करण्यात आली होती. यानंतर सदाशिव पेठ-शनिवार पेठ या प्रभागाला एक एकक मानून विविध प्रकारची विकासकामे खात्यांतर्गत समन्वयातून पूर्ण करण्यासाठी पाहणी दौरा करण्यात आला होता. त्या वेळी वीस जानेवारी पर्यंत कामे पूर्ण करण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आली होती. सदाशिव पेठ, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता परिसरातील रस्ता डांबरीकरणाची कामे टप्प्याटप्प्याने हाती घेण्याचेही निश्चित करण्यात आले होते. मात्र अद्यापही पाणीपुरवठा विभागाची कामेही अपूर्ण आहेत. अरुंद रस्ते आणि वर्दळीमुळे कामे करण्यास मर्यादा येत आहेत. त्यामुळे आता दहा फेब्रुवारीपर्यंत कामे करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना पुढील काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे.

मध्यवर्ती पेठांच्या भागात मुख्य बाजारपेठ असल्याने, तेथे दररोज मोठय़ा प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे गेली पंचेचाळीस वर्षे या भागातील पाणीपुरवठा आणि मैलापाण्याचे वहन करणाऱ्या वाहिन्या बदलताना मर्यादा येत होत्या. करोना संसर्ग टाळेबंदीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बाजारपेठ बंद होती. त्या काळात समान पाणीपुरवठा, सांडपाणी वहन, एमएनजीएल पुरवठा, इंटरनेट कंपन्या यांच्या वाहिन्या आणि केबल्स टाकण्याची कामे करण्यात आली होती. त्यासाठी या भागात मोठय़ा प्रमाणात खोदाई करावी लागल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली होती.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Digging roads trouble for few more days in pune city zws

ताज्या बातम्या